वाहतूककोंडीवर सहा पदरी उड्डाणपुलाचा उतारा, कल्याण पूर्व-पश्चिमेतील प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:55 AM2019-08-14T00:55:02+5:302019-08-14T00:55:19+5:30
कल्याण पूर्व-पश्चिमेतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने एका खाजगी कंपनीकडून सहा पदरी उड्डाणपुलाचा प्रशासकीय प्रस्ताव तयार केला आहे.
कल्याण : कल्याण पूर्व-पश्चिमेतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने एका खाजगी कंपनीकडून सहा पदरी उड्डाणपुलाचा प्रशासकीय प्रस्ताव तयार केला आहे. या पुलासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने पुलाचा प्रस्ताव सरकार दरबारी मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे.
कल्याण पूर्व-पश्चिमेला येजा करण्यासाठी पुणेलिंक रोडवरून रेल्वेच्या ह्यएफह्ण केबिनजवळ कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान आनंद दिघे रेल्वे उड्डाणपूल आहे. तसेच कल्याण-शहाड स्थानकादरम्यान वालधुनीनजीक रेल्वे उड्डाणपूल आहे. हे दोन्ही पूल वाहतूककोंडी फोडण्यासाठी तयार केले असले तरी सध्याची वाहतूक पाहता ते अपुरे पडतात. हे दोन्ही पूल दुपदरी आहेत. या पुलांपर्यंत जाणारे रस्ते निमुळते आणि अरुंद असल्याने तेथे प्रचंड वाहतूककोंडी होते.
कल्याण पश्चिमेला वालधुनी पूल कल्याण-मुरबाड रोडवर उतरतो. तेथे सुभाष चौकात प्रचंड वाहतूककोंडी होते. तसेच कल्याणहून कल्याण-बदलापूर मार्गाने कर्जतच्या दिशेने जाता येते. कल्याण-मुरबाडकडे काही जडवाहने बारवीमार्गे बदलापूरहून कल्याणच्या दिशेने येतात. तर काही वाहने कल्याणहून बदलापूरच्या दिशेने बारवीमार्गे मुरबाड व पुढे नगरच्या दिशेने जातात. तर, कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडने काही वाहने कल्याण पश्चिमेत येतात. ती कल्याण, नगर, नाशिक, भिवंडी, ठाणे या दिशेने जातात. त्यात मालवाहू वाहने, खाजगी वाहने,
कंपन्यांचे बस, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बस, परिवहन, शालेय बस, रिक्षा, दुचाकी या वाहनांचा त्यात भरणा अधिक असतो. परंतु, हा सगळा ताण हा सहा पदरी रस्त्याचा आहे. तो दुपदरी रस्त्यावर निभावून घेतला जातो.
कल्याण-मुरबाड रोड हा चार पदरी आहे. तर, कल्याण-बदलापूर मार्ग हा उल्हासनगरचा काही भाग सोडला तर पुढे चार पदरी आहे. त्याचबरोबर कल्याण-पुणे लिंक रस्ता हा चार पदरी आहे. मात्र, उड्डाणपूल हे दोन पदरी आहेत. त्यामुळे तीन किलोमीटर अंतराचा सहापदरी उड्डाणपुलाची लिंक तयार करणे गरजेचे होते, याकडे शिवसेना नगरसेवक राजेंद्र देवळेकर, दशरथ घाडीगावकर, रमेश जाधव यांनी लक्ष वेधले होते.
उड्डाणपुलाच्या या लिंकसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महासभेत ठराव मंजूर केला होता. या संदर्भात पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्राथमिक चर्चा करून या प्रकारचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेने तसा प्रस्ताव मंजूर करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम टीजीपी कंपनीला दिले आहे.
या कंपनीने सहापदरी उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी तो शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांच्याकडे सादर केला आहे.
या प्रकल्पाचे सादरीकरणे खासदार शिंदे व पालकमंत्र्यांनाकडेही केले जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. हा सहा पदरी उड्डाणपूल कल्याण पूर्वेतून विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते कल्याण पश्चिमेतील भवानी चौकापर्यंत प्रस्तावित आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढते नागरिकरण, दिवसेंदिवस वाढती वाहनांची संख्या आणि त्यामुळे शहरांमध्ये ठिकठिकाणी होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर हा उड्डाणपूल होण्याची गरज महापालिका वर्तुळातील जाणकारांनी
व्यक्त केली आहे.
राज्य सरकारकडे पाठवणार प्रस्ताव
महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने पुलाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या ४५० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाणार आहे. या पुलाच्या कामास मंजुरी मिळाल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल, असा विश्वास देवळेकर यांनी व्यक्त केला आहे
या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिका साडेतीन कोटी रुपयांचा खर्च करत आहे. सविस्तर प्रकल्प अहवालात महापालिकेच्या विकास आराखड्यात या पुलाची लिंक दिली आहे, याकडे प्रकल्प तयार करणाºया कंपनीने लक्ष वेधले आहे.