बार व्यवस्थापकासह सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:13 AM2019-01-25T04:13:29+5:302019-01-25T04:13:35+5:30
हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालविणाऱ्या कापूरबावडी नाका येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमधून सात बांग्लादेशींसह १६ महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी सायंकाळी सुटका केली.
ठाणे : हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालविणाऱ्या कापूरबावडी नाका येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमधून सात बांग्लादेशींसह १६ महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी सायंकाळी सुटका केली. बार व्यवस्थापक दिवाकर सुवर्णा, कॅशियर जगबंधू उर्फ देवा जेना यांच्यासह सहा जणांना या कारवाईत अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कापूरबावडी येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमध्ये दोन हजारांच्या बदल्यामध्ये शरीरविक्रयासाठी मुली पुरविल्या जात असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान याठिकाणी धाड टाकली. यादरम्यान, एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या माहितीची खातरजमा करण्यात आली. या प्रकाराची माहिती या गिºहाईकाने या पथकाला मोबाईलवर मिस कॉलद्वारे दिली. त्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. यात सहा जणांना अटक केली असून १६ महिलांची सुटका केली. यामध्ये सात बांग्लादेशी तरुणींचाही समावेश आहे. या सर्व महिलांना सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.