फेसबुकवर महिलेविरोधात अर्वाच्च भाषेत टीका करणा-या ६ मनसैनिकांना अटक व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 04:59 PM2018-06-06T16:59:54+5:302018-06-06T17:01:25+5:30
एलफिन्स्टन पादचारी पूल दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याविरोधात फेसबुकवर लिखाण करणा-या महिलेस अर्वाच्च व अपशब्दात प्रतिक्रिया देणा-या ६ मनसैनिकांना भार्इंदर पोलिसांनी अटक केली.
मीरारोड - एलफिन्स्टन पादचारी पूल दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याविरोधात फेसबुकवर लिखाण करणा-या महिलेस अर्वाच्च व अपशब्दात प्रतिक्रिया देणा-या ६ मनसैनिकांना भार्इंदर पोलिसांनी अटक केली. ठाणे न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेस पूल, रस्ते अडवून बसणारे फेरीवाले जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान उच्च न्यायालयाने देखील रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर तर शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळापासून १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली होती.
दरम्यान राज ठाकरे यांच्या निर्देशानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी फेरीवाल्यांना मारहाण वा त्यांच्या हातगाड्या उलथवून टाकणे आदी प्रकार चालवले होते. या विरोधात भार्इंदरला राहणा-या कल्पना संजय पांडे या महिलेने फेसबुकवर लेख लिहिला होता. त्या लेखा विरोधात राज्यभरातून मनसैनिकांनी निषेध केला होता. परंतु निषेध करतानाच त्यावर प्रतिक्रिया मात्र दमदाटीच्या तसेच अर्वाच्च अपशब्दात टाकल्या होत्या.
या विरोधात पांडे यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया देणा-या अशा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. फेबुकवर प्रतिक्रिया देणारे मनसैनिक राज्यातल्या विविध भागातले असल्याने पोलिसांनी त्यांचे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक आदी शोधून काढत नोटिसा बजावायला सुरुवात केली.
यातील ६ जणांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. अटक आरोपींमध्ये योगेश शांताराम चिले (३५) रा. कामोठे पोलीस ठाणेजवळ ; कौस्तुभ नंदकुमार लिमये (२५) रा. ब्राह्मणआळी, शहापुर ; मच्छींद्र एकनाथ गर्जे रा. आष्टी , बीड ; योगेश धोंडु तांबे (२५) रा. पेंडकळे, राजापुर ; अमोल रमेश सोगम (३१) रा. धोपेश्वर, राजापुर व सोनाली शिवाजी पाटील (२८) रा. बिंबिसार नगर, गोरेगाव यांचा समावेश आहे. या प्रकरणी अन्य आरोपींचा शोध सुरू असून, पांडेय यांचे पती वकील असल्याचे सूत्रांनी सांगितले.