परिवहनचे सहा सदस्य निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:38+5:302021-03-01T04:47:38+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील १३ सदस्यांपकी सहा सदस्य रविवारी निवृत्त झाले. परिवहन सदस्यांची निवड नगरसेवकांकडून महासभेत केली ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील १३ सदस्यांपकी सहा सदस्य रविवारी निवृत्त झाले. परिवहन सदस्यांची निवड नगरसेवकांकडून महासभेत केली जाते. पण नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्या सदस्यांच्या निवडीला ब्रेक लागणार आहे. निवडीवरून उभा राहिलेला पेच पाहता सचिव कार्यालयाकडून विधी विभागाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्यामुळे विधी विभाग काय निर्णय देतो? याकडे आता लक्ष लागले आहे.
परिवहन समितीतील सदस्यांना चार वर्षांचा कालावधी मिळतो. रविवारी सभापती मनोज चौधरी, संजय पावशे, प्रसाद माळी, कल्पेश जोशी, संजय राणे या सदस्यांसह कोरोनामुळे निधन झालेले सदस्य मधुकर यशवंतराव यांचा कालावधी संपुष्टात आला. कोरोनामुळे मनपाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यात नोव्हेंबरमध्ये नगरसेवकांचा कालावधीही संपुष्टात आल्याने परिवहनच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेलाही आता चाप बसला आहे. त्यामुळे ही सहा पदे मनपा निवडणूक होईपर्यंत रिक्तच राहतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. साधारणपणे सभापती पदाचा कालावधी हा एक वर्षाचा असतो. पण, कोरोनामुळे सभापतीपदाची निवडणूकही होऊ न शकल्याने मावळते सभापती चौधरी यांना सर्वाधिक पावणेदोन वर्षांचा कालावधी मिळाला आहे. यात आगारातील व्यवस्था आणि बसचे संचालन सुधारण्याकडे विशेष लक्ष देण्याबरोबरच २२ वर्षांपासून प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांची पदोन्नती, महिलांसाठी तेजस्विनी बससेवा, स्मार्ट सिटीअंतर्गत १५० ठिकाणी बसथांबे निवारे आदी महत्त्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले.
------------------------------------------------------