भिवंडीत सहा महिन्यांच्या पोटच्या गोळ्यास नाल्यात बुडवून मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:16 AM2018-08-13T06:16:24+5:302018-08-13T06:16:33+5:30
जन्मापासून आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या सततच्या रडण्यास कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याला नाल्यातील पाण्यात बुडवून मारल्याची घटना शनिवारी भिवंडी तालुक्यात उघडकीस आली.
भिवंडी - जन्मापासून आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या सततच्या रडण्यास कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याला नाल्यातील पाण्यात बुडवून मारल्याची घटना शनिवारी भिवंडी तालुक्यात उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आईस अटक केली आहे.
कल्पना निलेश गायकर (२५) असे मुलास मारणाऱ्या निर्दयी आईचे नाव असून ती भिवंडी तालुक्यातील कवाड ग्रामपंचायत हद्दीतील धापशीपाडा, कोलिवली या गावात पती आणि आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहे. तिचा रिषभ नावाचा सहा महिन्यांचा मुलगा जन्मापासूनच आजारी असून तो सतत रडत असल्याने त्याचे पालनपोषण करण्यास ती कंटाळली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात विश्वभारती फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावरील नाल्याच्या पाण्यात तिने रिषभला बुडवून मारले. त्यानंतर, रिषभ काही हालचाल करत नसल्याचे कुटुंबीयांना सांगून तिने त्यास खासगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने रिषभ मृत झाल्याचे सांगितल्याने धापशीपाडा, वाघिवली येथील पोलीसपाटील भगवान गडगे यांनी ही खबर तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून रिषभचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी रिषभचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना दिला. पोलिसांनी याबाबत रिषभच्या आदिवासी कुटुंबाची चौकशी केली. त्यावेळी त्याची आई कल्पनाने मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून त्यास बुडवून मारल्याची कबुली दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी कल्पना गायकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली आहे. तिला भिवंडी न्यायालयाने १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.