खारघरच्या वाहतूक पोलिसावर दुचाकी घालणाऱ्यास सहा महिने तुरुंगवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:36 AM2019-11-13T05:36:36+5:302019-11-13T05:36:40+5:30
मोटारसायकलवरून वेगाशी स्पर्धा करताना ती अडवणा-या वाहतूक पोलिसावरच मोटारसायकल घालणे खारघरमधील अमन दत्तात्रेय सातपुते याला चांगलेच महागात पडले आहे.
ठाणे : मोटारसायकलवरून वेगाशी स्पर्धा करताना ती अडवणा-या वाहतूक पोलिसावरच मोटारसायकल घालणे खारघरमधील अमन दत्तात्रेय सातपुते याला चांगलेच महागात पडले आहे. अमनला शुक्रवारी ठाणे जिल्हा न्यायालयाचे सहायक न्यायाधीश शैलेश तांबे यांनी दोषी ठरवून सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. हा प्रकार २८ मे २०१३ रोजी नवी मुंबई तेथील सीवूड येथे घडला होता.
अमन हा २८ मे रोजी सीवूड येथील पामबीचमार्गे मोटारसायकलवरून भरधाव निघाला होता. तेव्हा पामबीच सिंग्नल येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस राजेंद्र बोराटे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने मोटारसायकलची धडक बोराटे यांना मारून पळ काढला होता. यात बोराटे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी सहकारी पोलीस नाईक गजरे आणि पालवे यांनी जवळच्या खाजगी रु ग्णालयात दाखल केले.
त्यानंतर भरधाव वेगाने पळणाºया मोटारसायकलस्वार सातपुते याला पकडून तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सरकारी पक्षातर्फे तर बचाव पक्षाच्यावतीने अॅड. गुरजीत कौर आणि अॅड.एन.एम.मोरे यांनी युक्तीवाद केला.
सरकारी वकिलांनी या खटल्यात सात साक्षीदार तपासले. या खटल्यात न्यायालयात सादर साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश तांबे यांनी आरोपी अमन सातपुते याला दोषी ठरवून सहा महिन्यांचा तुरंगवास आणि बारा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.