भिवंडीत दोन दिवसात सहा मोटर सायकलींची चोरी; वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा हतबल
By नितीन पंडित | Published: September 2, 2022 07:39 PM2022-09-02T19:39:21+5:302022-09-02T19:39:36+5:30
वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात भिवंडी पोलिसांना पुरता अपयश आले असून वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भिवंडी: भिवंडी पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रात मोठ्या संख्येने वाहन चोरीच्या घटना घडत असून बुधवार व गुरुवार अशा दोन दिवसात नारपोली व शांतीनगर पोलीस ठाण्यात तब्बल सहा मोटर सायकल चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात भिवंडी पोलिसांना पुरता अपयश आले असून वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी नारपोली व शांतीनगर पोलीस ठाण्यात दोन वाहन चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. अर्जुन मंगल झा वय ४२ वर्ष रा. ब्रह्मानंद नगर, कामतघर यांनी त्यांची मोटरसायकल राहत्या घराजवळ उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली याप्रकरणी अर्जुनी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर मिलिंद विजय ठाकरे वय ३३ वर्ष रा. भादवड नाका यांनी त्यांचे मोटरसायकल राहत्या इमारतीच्या आवारात उभी करून ठेवली असता दोन अज्ञात चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने मोटरसायकल चालू करून चोरून नेली.याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन वाहन चोरीच्या घटनांनंतर शुक्रवारी देखील शांतीनगर व नारपोली पोलीस ठाण्यात तब्बल चार वाहन चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. अविनाश लक्ष्मण पाचवणे रा.मिठपाडा,शेलार गाव याने आपली मोटर सायकल रात्री रामनगर, चाविंद्रा रोड, या ठिकाणी उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजुरफाटा ओसवाल वाडी येथे राहणारे दिप नागरीया याने आपली दुचाकी भिवंडी रोड रेल्वे स्थानकांच्या पार्किंग मध्ये उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.तर सरवलअली मोहम्मदअली अन्सारी रा.विठ्ठल नगर याने आपली दुचाक ही राहत्या इमारती खाली उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तर नविनकुमार रामनिवास शर्मा याने आपली मोटर सायकल दापोडा येथील डिंपल वाईन शॉपच्या बाजुला रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली असता सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ती अज्ञात चोरट्याने पळविली आहे. या तिन्ही घटनांप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.