ठाण्यात आढळले इन्फ्लुएंझाचे सहा रुग्ण; आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या आयुक्तांच्या सूचना
By अजित मांडके | Published: March 17, 2023 06:18 PM2023-03-17T18:18:39+5:302023-03-17T18:20:11+5:30
या आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.
ठाणे : महापालिका क्षेत्रात करोना रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झालेला असतानाच, शहरात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने डोकेवर काढल्याचे समोर आले आहे. या आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. करोनाबरोबरच इन्फ्ल्युएंझा आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरु झाली असून यामुळे शहराची आरोग्य चिंता वाढली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण आढळून येत असून या आजाराने ठाणे शहरातही डोकेवर काढल्याचे समोर आले आहे. या आजाराचे शहरात सहा रुग्ण आढळून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर करोना आणि इन्फ्लुएंझा बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिले आहेत.
महापालिका क्षेत्रात करोना आणि ‘एच ३ एन २’ चे रुग्ण आढळून आले असले तरी यावर तातडीने प्रतिबंध व्हावा यासाठी महापालिकेने संपूर्णत: तयारी केली असून या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता आणि न घाबरता आपल्या जवळच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे. घसा दुखणे, नाक वाहणे किंवा चोंदणे, ताप येणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या आरोग्यकेंद्रात जाऊन तपासण्या कराव्यात आणि आजार अंगावर काढू नये असेही त्यांनी म्हटले आहे.