चालकाला चक्कर आल्याने रिक्षा उलटून सहा जण जखमी
By जितेंद्र कालेकर | Published: August 25, 2023 10:35 PM2023-08-25T22:35:17+5:302023-08-25T22:35:30+5:30
जखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केले दाखल
ठाणे : भिवंडी, काल्हेर येथून ठाणे रेल्वे स्थानकाकडे प्रवासी घेऊन निघालेली रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास साकेत रोड, पोलिस मैदानाजवळ घडली. या घटनेत रिक्षाचालक शिवकुमार जयस्वाल (वय ५०) आणि पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींमध्ये एका चार वर्षीय मुलीचाही समावेश आहे.
रिक्षाचालक जयस्वाल यांच्यासह काल्हेर येथे राहणारी सृष्टी सचिन पाटील (४) तिची आई शीतल (३०), यश पाटेकर (२९), स्नेहल मिश्रा (२७) आणि विकास सिंग असे सहाजण या अपघातात जखमी झाले. जयस्वाल हे शुक्रवारी दुपारी पाच प्रवासी घेऊन काल्हेर येथून ठाणे स्थानकाकडे निघाला होते. साकेत रोड येथील पोलिस कवायत मैदानजवळ येताच, जयस्वाल यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा उलटली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पाेलिस तसेच शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले.
रिक्षाचालक जयस्वाल यांना डाव्या खांद्याला व डोक्याला मार लागला आहे, तर चार वर्षीय सृष्टी हिच्या डोक्याला मुका मार लागला आहे. तिची आई शीतल यांच्या मानेला, स्नेहल मिश्रा यांच्या उजव्या हाताला, यश पाटेकर यांच्या डोक्याला व डाव्या खांद्याला आणि विकास सिंग यांच्या डाव्या खांद्याला मार लागला आहे. अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.