पळालेल्या कैद्याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:11 AM2019-07-18T01:11:59+5:302019-07-18T01:12:04+5:30
पळालेल्या न्यायालयीन बंदी नरेश फगुनमल छाब्रिया (२९, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) या आरोपीला शोधण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह सहा वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळून पळालेल्या न्यायालयीन बंदी नरेश फगुनमल छाब्रिया (२९, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) या आरोपीला शोधण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह सहा वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शोधण्याचे आदेश मंगळवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.
ठाणे विशेष मकोका न्यायालयात मंगळवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे नरेश याला इतर आरोपींसह नेले जात होते. त्याचवेळी कैदी पार्टीच्या बंदोबस्तावरील सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवराम चव्हाण यांच्या हाताला जोरदार झटका देऊन तो पळून गेला. यामुळे त्याच्या शोधासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे शोध पथक (डीबी) तसेच उल्हासनगरचे हिललाइन, भिवंडीचे शांतीनगर तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट १ ठाणे शहर, युनिट २ भिवंडी आणि युनिट ३ कल्याण अशा सहा पथकांची त्याच्या शोधासाठी निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह त्यांचे पथक त्याच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याविरुद्ध चोरी, दरोडा तसेच मकोकांतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. ठाणे जिल्हा विशेष मकोका न्यायाधीशांकडे १६ जुलै रोजी सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा ठाणे कारागृहाकडे पोलीस मुख्यालयाचे जमादार चव्हाण आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये पायी नेले जात होते. कारागृहापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या किल्ला मारुती मंदिराजवळ आल्यानंतर त्याने वाहतूककोंडीचा फायदा घेऊन चव्हाण यांच्या हाताला धक्का देऊन पलायन केले. चव्हाण यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या हातातही आणखी तीन आरोपी असल्यामुळे त्यांना नरेशचा पाठलाग करता आला नाही. तर, चव्हाण यांना झटका दिल्यानंतरही त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. एका वाहनाच्या आडून तो पसार झाल्याची माहिती त्यांनी ठाणेनगर पोलिसांना दिली.
>वॉरंट काढल्यानंतर
झाली होती अटक
२०१० मध्ये नरेश विरुद्ध दाखल झालेल्या एका प्रकरणात वारंवार वॉरंट बजावूनही तो न्यायालयात सुनावणीसाठी हजर होत नव्हता. अखेर, २६ जूून २०१९ रोजी त्याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याचदरम्यान त्याच्याविरुद्ध मकोकाचीही कारवाई करण्यात आली.