CoronaVirus News: सहा पोलिसांना कोरोनाची लागण; ठाण्यात आतापर्यंत २७५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:12 AM2020-06-16T00:12:29+5:302020-06-16T00:12:47+5:30
१९३ जणांनी केली मात
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका सहायक पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी समोर आले. आतापर्यंत २६ अधिकाऱ्यांसह २७५ पोलीस बाधित झाले असून तब्बल १९३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही पोलिसांमध्ये अधिक असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणचा बंदोबस्तही कमी केला आहे. तरीही दाटीवाटीची वस्ती तसेच रुग्णांची संख्या लक्षणीय असलेल्या भागातील पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याची बाब समोर आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे एक सहायक पोलीस निरीक्षकास १३ जून रोजी त्रास झाल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना निआॅन रुग्णालयात दाखल केले आहे.
बाजूच्याच डायघर पोलीस ठाण्यातील एक पोलीस हवालदार आणि दोन पोलीस नाईक अशा तीन कर्मचाऱ्यांनाही १३ जून रोजी निआॅन रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याआधी राबोडी पोलीस ठाण्यातील हवालदार आणि उल्हासनगरच्या नियंत्रण कक्षातील एका महिला कर्मचाºयाचाही १२ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.
या सहा पोलिसांच्या संपर्कातील पोलीस आणि नागरिकांचीही माहिती घेतली जात असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.
आतापर्यंत २६ पोलीस अधिकारी आणि २४९ कर्मचारी अशा २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. सध्या सहा अधिकारी आणि ७४ कर्मचारी अशा ८० पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तब्बल २० अधिकारी आणि १७३ कर्मचारी अशा १९३ पोलिसांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाणही चांगले असल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.