दहीहंडीत भाजपाच्या आयोजकांना अभय, ध्वनिप्रदूषणाचे अवघे सहा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:09 AM2018-09-08T00:09:17+5:302018-09-08T00:09:34+5:30
सोमवारी गोपाळकाला उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात प्रस्ताव सादर करताना ठाणे शहर पोलिसांनी भाजपाच्या आयोजकांना अभय दिले आहे.
ठाणे : सोमवारी गोपाळकाला उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात प्रस्ताव सादर करताना ठाणे शहर पोलिसांनी भाजपाच्या आयोजकांना अभय दिले आहे. गेल्या दोन दिवसांत शहर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन करणाºया मंडळाचे अवघे सहा प्रस्ताव महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे धाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रस्तावांमध्ये शिवसेना, मनसे या पक्षांच्याच आयोजकांचा समावेश आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील आयोजकांनी दहीहंडीवर लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव केला. ठाणे आणि भिवंडी येथील दहीहंड्यांना स्वत: मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. ठाणे असो, कल्याण-डोंबिवली, भिवंडी किंवा उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर परिसरात डीजेने नागरिकांच्या कानठळ्या बसल्या. त्यातील बहुसंख्य दहीहंडीचे आयोजन लोकवस्तीत करण्यात आले होते. काही ठिकाणी शाळा, शासकीय कार्यालय, हॉस्पिटल आदींचा समावेश होता. डीजेने कानठळ्या बसवणाºया भाजपाच्या मंडळासाठी नाट्यगृहासह बालरुग्णालयाचे रस्ते पूर्वसूचना न देता बंद केले होते. मात्र, मुख्यमंत्री आले म्हणून की काय, त्या झोनसह भिवंडीमधून एकही प्रस्ताव न पाठवता तेथील मंडळांना अभय दिले आहे.
नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलावपाळीचे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, मनसेची दहीहंडी, तर कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यातील मध्यवर्ती शिवसेना शाखा मंडळ आणि धर्मवीर मित्र मंडळाविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव आहे. ठाणेनगर आणि विष्णूनगर ठाण्यांतून गेलेल्या प्रस्तावांची नावे समजू शकली नाहीत.
न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा ध्वनिप्रदूषणाबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किंवा महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांवर जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारा कालावधी कमी झाला. मात्र स्थानिक पोलिसांनी या कारवाईत चालढकल केली.