दरोड्याच्या तयारीतील ६ सराईत गुन्हेगारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:15 AM2019-06-19T04:15:47+5:302019-06-19T04:15:52+5:30
तलवार,सुरा आणि चेहरा लपविण्याकरिता काळ्या रंगाचे कापडी मास्क जप्त
ठाणे : पाचपाखाडीतील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना नौपाडा पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून तलवार,सुरा आणि चेहरा लपविण्याकरिता काळ्या रंगाचे कापडी मास्क असा ऐवज जप्त केला असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील बहाद्दूरसिंग मेहरा याला वागळे इस्टेट पोलिसांनी तडीपार केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांना सिद्धेश्वर तलाव परिसरात काही इसम दरोडा घालण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ठाण्याच्या नुराबाब दर्गा रोड येथे राहणाऱ्या निहार भालचंद्र बेलोसे (२१), मुंबईच्या सायन येथील धीरज सायमन जॉनअप्पा (२४),वागळे इस्टेट येथील बहाद्दूरसिंग मातबरसिंग मेहरा (२३), दिव्यातील सोनू राजेंद्र मिश्रा (३४) , वसंतविहार येथील प्रणिल प्रकाश साळवी (३३) आणि तुळशीधाममधील दीपक भिकाजी गायकवाड (३१) अशा सहा जणांना पळून जाताना अटक केली. त्यांच्याकडून तलवार, सुरा ही हत्यारे, चेहरा लपविण्याकरिता काळ्या रंगाचे कापडी मास्क असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी पाचपाखाडी येथील भूषण ज्वेलर्स दुकानात दरोडा घालण्याची पूर्वतयारी केली होती.
याप्रकरणी त्याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निहार याच्यावर गाडी जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर धीरज यांच्याविरोधातही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. ही कारवाई, पोलीस उपनिरीक्षक कवळे ,पोलीस हवालदार सुनीर अहीरे आदी पथकाने केली.