स्वाइनचे सहा तर डेंग्यूचा एक बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:36 AM2019-07-17T00:36:51+5:302019-07-17T00:36:57+5:30
ठाणे महापालिका हद्दीत डेंग्यूने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर स्वाइन फ्लू आणि लेप्टोची लागण झाल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत डेंग्यूने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर स्वाइन फ्लू आणि लेप्टोची लागण झाल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. परंतु, मागील सात महिन्यांत ठाण्यात स्वाइन फ्लूने चांगलेच डोके वर काढल्याचे ठाणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जानेवारी ते जुलै या कालावधीत ७८ जणांना स्वाइनची लागण झाली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत डेंग्यूनेही एकाचा मृत्यू ओढवला असून सात महिन्यात १२५ जणांना त्याची लागण झाली आहेतर ८३ रुग्ण हे संशयित आढळले आहेत.
पावसाळा सुरू झाला की साथ रोगांचा फैलाव सुरू होतो. ठाण्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची रुग्णांत काहीशी घट झाली असली तरी पावसाळा अद्याप संपला नसल्याने या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी फवारणी करत असली तरी ती फायद्याची ठरत नसल्याचेच दिसते. यामध्ये नागरिकांनीदेखील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साठवून ठेवू नये असे आवाहनही ठाणे महापालिकेने केले आहे.
जानेवारी ते जुलै या कालावधीत डेंग्यूचे १२५ संशयित आढळले असून यामध्ये ४२ जणांना त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे स्वाइननेदेखील डोके वर काढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
ठाणे महापालिका हद्दीत ७८ जणांना त्याची लागण झाली असून यामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत हे रुग्ण आढळले असून यामध्ये ६० वर्षे वयोगटांतील वृद्धांची संख्या ही जास्त असून हा आकडा २७ एवढा आहे. त्या खालोखाल ६० वर्षांपर्यंतच्या १२, ५० वयोगटांपर्यंत १५, ४० वयोगटार्पंत २०, १० ते २० वयोगटातील सहा जणांना आणि ० ते ५ वयोगटांतील तीन जणांना
स्वाइनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
>डेंग्यूची लागण झालेले रुग्ण
महिना (२०१९) लागण संशयित मृत्यू
जानेवारी १७ ०३ ००
फेब्रुवारी ०१ ०१ ००
मार्च ०० ०२ ००
एप्रिल ०१ ०३ ००
मे १३ १९ ००
जून ०० ४५ ००
जुलै ०० १० ०१
एकूण ४२ ८३ ०१