ठाण्यात सहा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण मुंब्य्रात एकाच दिवशी पाच जणांना कोरोनाची लागण, कोरोना बाधीतांची संख्या झाली ३३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:06 PM2020-04-09T20:06:56+5:302020-04-09T20:14:26+5:30
ठाण्यात आज एका दिवसात कोरोना बाधीतांची संख्या सहाने वाढली आहे. शहरातील कळवा आणि मुंब्रा भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे : कोरोनाची संख्या आता ठाण्यात वाढतांना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात ठाण्यात नव्या सहा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश असून ती खारेगाव भागात वास्तव्यास आहे. तर मुंब्य्रातील काळसेकर हॉस्पीटलमधील एका कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य पाच जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ३३ झाली आहे. तर कळव्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १२ तर मुंब्य्रातील कोरोना बाधीतांची संख्या ही ९ झाली आहे.
ठाण्यातील कळवा खारेगाव याठिकाणी वास्तव्यास असलेल्या सहा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. या मुलीच्या घरी कोल्हापूर येथून १५ वर्षीय मुलगी आली होती. सदर १५ वर्षीय मुलगी ही कोल्हापुर येथे एका महिलेच्या अंत्ययात्रेसाठी गेली होती. जी मयत महिला होती, तिला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ती ठाणे खारेगाव या भागात आपल्या नातेवार्इंकाकडे आली होती. जेव्हा ती आली, तेव्हांपासून सदर १५ वर्षीय मुलीला घरातच क्वॉरन्टाइन करण्यात आले होते. परंतु तिचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे. दुसरीकडे काळजी म्हणून त्या घरातील सहा वर्षीय मुलीची तपासणी केली असता, तिचा रिपोर्ट मात्र पॉझीटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्यावर होराईझन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिची आई, वडील, काका आणि आजी यांना देखील पालिकेने घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. तर कळव्यातील एका खाजगी रुग्णालयात गेलेल्या व्यक्तीची रिपोर्ट पॉझीटीव्ह आला होता. त्यानंतर आता त्याच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कळव्यातील रुग्णांची संख्या आता १२ वर पोहचली आहे.
दुसरीकडे बुधवारी मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयात कामाला असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर पाच जणांना पालिकेने क्वॉरन्टाइन केले होते. गुरुवारी त्यांची चाचणी केली असता, ती पॉझीटीव्ह आली आहे. त्यामुळे आता मुंब्य्रात एकाच दिवशी पाच नव्या रुग्णांची भर पडली असून येथील रुग्णांची संख्या आता थेट ९ वर गेली आहे. तर ठाण्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२ वर गेली आहे.