कोरोना लसीकरणात ठाणे जिल्हा राज्यामध्ये सहावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:09 AM2021-02-08T01:09:56+5:302021-02-08T01:10:10+5:30

दुसऱ्या टप्प्याला शनिवारपासून झाली सुरुवात : ग्रामीणमध्ये ६४ टक्के

Sixth in Corona Vaccination in Thane District State | कोरोना लसीकरणात ठाणे जिल्हा राज्यामध्ये सहावा

कोरोना लसीकरणात ठाणे जिल्हा राज्यामध्ये सहावा

Next

- सुरेश लाेखंडे

ठाणे :  जिल्ह्यातील पहिल्या फळीतील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधात्मक ‘कोविशिल्ड’ या नावाची लस दिली जात आहे. याशिवाय दुसऱ्या फळीतील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू झाला आहे. आतापर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील ४४ लसीकरण केंद्रांवर ४० हजार ३७६ जणांचे म्हणजे ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले. यापैकी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लसीकरण ६४ टक्के पूर्ण झाले आहे. यानुसार या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात ठाणे जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे.

केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने राज्यभरात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन प्रकारच्या लसींना मान्यता दिली आहे. यानुसार जिल्ह्यात कोविशिल्ड या लसीचा डोस जिल्ह्यातील आरोग्याच्या फ्रंटिअर अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. 

याशिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी स्वत: लस घेऊन दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात केली. शनिवारपर्यंत जिल्ह्यात ७५ टक्के म्हणजे महापालिकांसह ग्रामीण भागातील तब्बल ४० हजार ३७६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

यामध्ये ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागासह नगर परिषदांच्या शहरांमधील सात हजार ९१५ जणांपैकी पाच हजार ५७ आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

पालघर जिल्हा सातव्या स्थानी
जिल्ह्यातील या ‘कोविशिल्ड’ लसीकरणात ठाणे जिल्हा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर पालघर जिल्हा असून सातव्या क्रमांकावर नांदेड जिल्हा आहे. सध्या जिल्ह्यात सुरू केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी २२ जानेवारीला ‘कोविशिल्ड’ लसचा साठा उपलब्ध झालेला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर ६४ टक्के लसीकरण पूर्ण झाले. 

इतक्या जणांनी 
घेतली लस
यामध्ये सिव्हिल रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावरील एक हजार २०० जणांच्या लसीकरणापैकी ८८९ जणांनी लस घेतली आहे. 
तर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एक हजार ११० पैकी ५६४ जणांचे लसीकरण झाले. 
उपजिल्हा रुग्णालय शहापूरला एक हजार २०० पैकी ७१४ लसीकरण, मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात ६०५ पैकी ३९८ लसीकरण झाले. तर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात ७०० पैकी ४६७ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. 
अंबरनाथच्या छाया रुग्णालयात एक हजार २०० पैकी ८८४ लसीकरण पूर्ण झाले. तर कल्याणच्या निळजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७०० पैकी ३९७ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने सद्यस्थितीत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन कोविड १९ लसींना मान्यता दिली आहे. यापैकी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ ही लस प्राप्त झाली आहे. तांत्रिक समितीने सांगितल्याप्रमाणोच ती घेतल्याने कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी ती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    - डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य     अधिकारी, जि.प. ठाणे

कुठे, किती लसीकरण
ठाणे सिव्हिल रुग्णालयात ८८९ लसीकरण
अंबरनाथ छाया रुग्णालयात ८८४ लसीकरण
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात ७१४ लसीकरण
कल्याण निळजे प्रा.आ. केंद्र ३९७ लसीकरण
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात ३९८ लसीकरण
भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात ४६७ लसीकरण

Web Title: Sixth in Corona Vaccination in Thane District State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.