सहावी मार्गिका होणार २०२० अखेरीस पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:29 AM2019-06-16T00:29:57+5:302019-06-16T00:30:44+5:30
मुंबापुरीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक पंधरवड्यापासून विविध तांंत्रिक कारणांनी कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यातील २० लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला.
- अनिकेत घमंडी
मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत, त्याचे काय?
अनेकदा सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवते. याशिवाय कर्जत, कसारा मार्गावर म्हशींसह अन्य प्राणी रेल्वे मार्गात येतात. अनेकदा गर्दीच्या रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचा अपघात होतो, तर कधी चेन पुलींग केले जाते. त्यामुळे लोकल थांबली की, ती पुन्हा सुुरु व्हायला ४ मिनिटे लागतात. त्यामुळे लोकलचे ‘बंचिंग’ होते. हिवाळ्यात, पावसाळ्यात रुळांना तडा जातो. त्याची कामे तातडीने करावी लागतात. अशा नानाविध कारणांनी मध्यरेल्वेची उपनगरिय लोकल सेवा प्रभावित होते. त्याचा परिणाम साहजिकच वेळापत्रकावर होतो. बरेचदा तांत्रिक समस्यांमुळे लोकलसेवा विस्कळीत होते. पँटोग्राफची समस्याही अधुनमधून उद्भवते. मध्य रेल्वे सीएसएमटी ते कसारा १०७ किमी, कर्जत मार्गावर ९५ किमी, तर खोपोलीपर्यंत १२० किमी धावते. लांबच्या प्रवासात अनेक अडचणी येतात. पण तरीही अपवाद वगळता लोकल सेवा अखंड सुरु असते. मध्य रेल्वेमधून प्रतीदिन ४२ लाख ५० हजार प्रवासी मुख्य, हार्र्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करतात. दिवसाला १७७२ लोकल फेºया करणारी देशभरामध्ये सगळ्यात मोठी उपनगरिय रेल्वे सेवा अशी मध्य रेल्वेची ख्याती आहे.
पावसाळ्यात रेल्वेसेवा ठप्प होऊ नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
सगळ्यात जास्त समस्या पावसाळ्यात भेडसावतात. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्सहार्बर भागामध्ये बहुतांश ठिकाणी खाडीकिनारा आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे ते कल्याण भागामध्ये रुळालगतच खाडी आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्राच्या भरती, आहोटीनुसार पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. सायन, कुर्ला, हार्बरला काही भागात, तसेच कळवा आदी ठिकाणी जमिनीच्या सखल भागात रेल्वे रुळावर पाणी साचण्याच्या समस्या उद्भवतात. मात्र आता त्या ठिकाणी पाणी तुंबू नये आणि रेल्वे सेवा प्रभावित होऊ नये यासाठी परेल, माटुंगा, सायन आदी ठिकाणी रेल्वे रुळांची उंची ५ इंचापर्यंत वाढवण्यात आली आहे. मानखुर्द स्थानकातदेखील रुळांची उंची ५ इंचांनी वाढवण्यात आली आहे. लोकलसेवा वेळेत चालवण्यासाठी विशेष स्टाफची निर्मिती केली आहे. सीएसएमटी, कुर्ला, ठाणे, कल्याण आदी स्थानकांत हे विशेष कर्मचारी लोकल सेवा का वेळेत धावत नाही, याची पाहणी करतील आणि समस्या निर्माण झाल्यास त्यावर काय तोडगा काढायचा, यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करतील. रेल्वे रुळांमध्ये तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सुमारे ९७ ठिकाणी वॉटर पंप लावण्यात आले असून ते चांगल्या क्षमतेचे आहेत.
ठाणे जिल्ह्यातील लोकल फेºया कधी वाढणार?
५/६ व्या रेल्वे लाइनचे काम प्रगतिपथावर असून कल्याण ते दिवा, तसेच ठाणे ते कुर्ला मार्गावर काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे-दिवा मार्गावर हे काम सुरु आहे. पण गतवर्षीपासून या कामाने जोर धरला असून, दिवा, मुंब्रा, कळवा रेल्वे मार्गावर विशेषत: धिम्या दिशेकडे झालेले मोठे बदल प्रवासी रोज बघतच आहेत. खाडी मार्गातून काम करताना अनेक अडथळे येतात, पण तरीही त्यावर मात करून काम पुढे सरकत आहे. मात्र जोपर्यंत ५/६व्या मार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत लोकल फेºया वाढवण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या १७७२ फेºया आहेत, त्या वेळेत कशा धावतील, यावरच भर देण्यात येणार आहे. ते कामदेखील २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. कल्याण-कसारा मार्गावर तिसºया लाइनचा प्रकल्प प्रगतिपथावर असून तो केंद्राकडून मंजूर झाला आहे. आगामी काळात रेल्वे पादचारी पूलांची नवनिर्मिती, जुन्या पुलांची डागडुजी, एस्केलेटर, स्वच्छतागृह अशा विविध सुविधाही टप्प्याटप्प्याने दिल्या जातील.
मुंबापुरीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक पंधरवड्यापासून विविध तांंत्रिक कारणांनी कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यातील २० लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला. आधीच बेरोजगारीचा प्रश्न पेटलेला असताना, लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने आहेत त्या नोकºया टिकवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. चाकरमान्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लेटमार्क, तसेच संध्याकाळी घरी परतण्यास प्रचंड यातनांना सामोरे जावे लागत असून, विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयासाठी विलंब होत आहे.
विशेषत: ठाणे जिल्ह्यात रेल्वे समांतर रस्त्याची बोंब आहे. जलवाहतुकीचा पर्याय कागदावर असून, बहुतांश रस्ते वाहतूककोंडीत अडकले आहेत. रेल्वे व्यतिरिक्त वाहतुकीचे सर्वच पर्याय खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने विचित्र कोंडीत आणि कात्रीत अडकलेल्या प्रवाशांना कोणीही वाली नसून, त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. रोज मरे त्याला कोण रडे, अशी स्थिती प्रवाशांची असून, पावसाळा आला की या समस्यांमध्ये आणखी भर पडते.
या दिवसांमध्ये आबालवृद्धांना रेल्वे प्रवासाच्या नावाने अक्षरश: धडकी भरते. पण यंदा मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल वेळेवर धावावी, पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी तुंबू नये यासाठी काही पावले उचलली आहेत. रेल्वे प्रवाशांना अखंड सेवा मिळावी, यासाठी रेल्वेने केलेल्या उपाययोजनांची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली.