पालकांच्या खिशाला बसली कात्री, वह्या अन् पाठ्यपुस्तकांच्या किमतीत २० ते ३० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:28 AM2019-06-13T00:28:06+5:302019-06-13T00:28:10+5:30
वह्या, पाठ्यपुस्तके महागली : किमतीत २० ते ३० टक्के वाढ, खरेदीसाठी उडाली झुंबड
ठाणे : जून महिना उजाडताच पावसाबरोबरच शाळेचेही वेध लागतात. त्यामुळे शालेय खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. कागदाचे दर वाढल्यामुळे यंदा शालेय वह्या आणि अभ्यासक्रम बदललेल्या इयत्ता दुसरी आणि अकरावीच्या पाठ्यपुस्तकांना बसला आहे. वह्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी, तर पुस्तके दीड पटीने महागली आहेत.
यावर्षी छोट्या वह्यांची किंमत २० टक्क्यांनी तर मोठ्या वह्यांची किंमत ३० टक्क्यांनी वाढली आहे. गतवर्षी छोट्या वह्यांचे दर २८ ते ३५ रुपये होते. यंदा ही किंमत ३५ ते ४५ रुपयांवर गेली आहे. मोठ्या वहीची किंमत ४० ते ५८ रुपयांवरून ४८ ते ६५ रुपयांवर गेली आहे. रंगांच्या साहित्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ होते. यंदाही यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा इयत्ता दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शासनाकडून येणाऱ्या इंग्रजी व मराठी माध्यमांच्या गणित, इंग्रजी आणि मराठी या विषयांच्या पुस्तकांचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी इयत्ता दुसरीच्या इंग्रजी माध्यमाच्या गणित, इंग्रजी, मराठी या तीन पुस्तकांचा दर ९७ रुपये तर मराठी माध्यमाच्या तिन्ही विषयांच्या पुस्तकांचा दर ९९ रुपये होता. यंदा दुसरी इयत्तेचे शासनाकडून येणारे इंग्रजी माध्यमाचे मराठी या विषयाचे पुस्तक अद्याप आले नसले तरी मराठी माध्यमाचे इंग्रजी या विषयाचे पुस्तक उद्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी ८०० ते ९०० रुपये दराने मिळणारे गाइड्स हे यंदा दुपटीने म्हणजे १५०० ते १६०० रुपये दरांनी मिळत असल्याचे मंदार मेहेंदळे यांनी सांगितले.
इयत्ता दुसरीच्या पुस्तकांचे वाढलेले दर
इंग्रजी माध्यम मराठी माध्यम
विषय आधीचे दर आताचे दर आधीचे दर आताचे दर
इंग्रजी ३३ ५१ ३३ ४२
गणित ३३ ५३ ३३ ५३
मराठी ३१ - ३३ ५१
पावसामुळे ओसरली खरेदीची गर्दी
तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी येणाºया विद्यार्थी आणि पालकांची गर्दी ओसरली आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. साधारण दुपारनंतर खरेदीसाठी गर्दी होते. ही गर्दी पावसाने थोपवून धरली आहे. सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शनिवार-रविवारी गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.
दरवर्षी दोन इयत्तांचा अभ्यासक्रम बदलत असतो. गेल्या वर्षी पहिली आणि आठवी इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला होता. यंदा इयत्ता दुसरी आणि अकरावी इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला आहे.
- मंदार मेहेंदळे, बुक स्टॉलचे मालक