कल्याणमध्ये अडवले स्कायवॉक : वारांगना, रिक्षाचालकांमुळे पादचारी त्रस्त,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:12 AM2018-01-02T06:12:53+5:302018-01-02T06:12:59+5:30
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्याकरिता केडीएमसी आणि रेल्वे प्रशासनाने मोहीम उघडली आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त झालेल्या स्कायवॉकचा कब्जा वारांगनांनी घेतला आहे.
- प्रशांत माने
कल्याण : एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्याकरिता केडीएमसी आणि रेल्वे प्रशासनाने मोहीम उघडली आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त झालेल्या स्कायवॉकचा कब्जा वारांगनांनी घेतला आहे. त्याच वेळी बेशिस्त रिक्षाचालकांमुळे होणाºया कोंडीचा स्कायवॉकला विळखा पडत आहे. त्यामुळे स्कायवॉकवरून चालत जावे, तर वारांगनांचा त्रास आणि स्कायवॉक टाळून रस्त्याने जावे तर फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मनमानीचा मनस्ताप, अशा कोंडीत नागरिक सापडले आहेत. स्कायवॉकवरील अनैतिक धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरू असून रेल्वेस्थानक परिसरातील बेशिस्त कोंडीकडे आरटीओ, वाहतूक आणि शहर पोलिसांनी कानाडोळा केला आहे.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध रेल्वे प्रशासनाकडून जेवढ्या प्रभावीपणे कारवाई सुरू आहे, तेवढी प्रभावी कारवाई केडीएमसीकडून होताना दिसत नाही. डोंबिवलीचा अथवा कल्याणच्या स्कायवॉकवर दिवसभर तुरळक प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसून येते. मात्र, स्कायवॉकचा जो भाग मोकळा केला आहे, तेथे वारांगनांचा उपद्रव वाढला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकवर सायंकाळी वारांगना असतात, तर कल्याणला संत रोहिदास चौकाकडे जाणाºया स्कायवॉकचा ताबाही वारांगनांनीच घेतला आहे. साहजिकच, या स्कायवॉकवर वारांगना, त्यांचे गिºहाईक आणि अनैतिक व्यवसायातील मंडळींचा सुळसुळाट असल्याने सर्वसामान्य पादचारी व प्रामुख्याने महिला-मुली या स्कायवॉकचा वापर करणे टाळतात. कल्याण व डोंबिवलीतील पोलिसांचे याकडे एकतर साफ दुर्लक्ष झाले आहे अथवा पोलिसांचे लागेबांधे असल्याने राजरोस शरीरविक्रय करणाºयांना त्यांनी खुली सूट दिली आहे. यापूर्वी स्थानिक एमएफसी पोलिसांकडून कारवाई झाली होती. परंतु, गेल्या कित्येक दिवसांत पोलिसांच्या गस्तीअभावी वारांगनाचा मुक्त संचार बोकाळल्याचे चित्र आहे.
रिक्षाचालकांना शिस्त कधी लागणार?
कल्याण-डोंबिवलीत बहुतांश रिक्षा स्टॅण्ड बेकायदा आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराला बकालपणा आला आहे. रिक्षाचालक रेल्वे स्थानक परिसरात मनमानी पद्धतीने रांगा लावतात.
केवळ दूरवरची भाडी स्वीकारायची व जवळच्या प्रवाशांसोबत उर्मटपणे वागायचे, मनाला येईल ते भाडे मागायचे, अशी गुंडगिरी रिक्षाचालक करत आहेत. स्कायवॉकच्या ठिकाणी एकाला एक खेटून रिक्षा उभ्या करून ते लोकांचा स्कायवॉककडे जाण्याचा मार्ग अडवत आहेत.
इंदिरा गांधी चौकात, तर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा कळस गाठलेला दिसतो. केडीएमटीच्या बस व अन्य वाहनांना तेथून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसते. स्थानकापासून केडीएमटीची बससेवा सुरू होऊ नये, यासाठी हेतुत: ही बजबजपुरी माजवली गेली आहे.
रिक्षाचालकांच्या भगव्यापासून लाल बावट्यापर्यंत डझनभर युनियनची टर्रेबाजी करत फिरणारे नेते, आरटीओ व वाहतूक पोलीस यांच्या हप्तेबाजीच्या संघटित गुन्हेगारीमुळेच पादचारी व रिक्षा प्रवासी त्रस्त आहेत.