स्केटिंगपटूंची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 07:57 PM2018-03-25T19:57:47+5:302018-03-25T19:57:47+5:30
मीरा-भार्इंदरमधील १२ बाल स्केटिंगपटूंनी बेळगाव येथे आॅक्टोबर २०१७मध्ये आयोजित कुकिज् डंकिंग रिले प्रकारात सलग २६ तास स्केटिंग करून जागतिक विक्रम केला आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदरमधील १२ बाल स्केटिंगपटूंनी बेळगाव येथे आॅक्टोबर २०१७मध्ये आयोजित कुकिज् डंकिंग रिले प्रकारात सलग २६ तास स्केटिंग करून जागतिक विक्रम केला आहे. त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याने त्या स्केटिंगपटूंचा आ. नरेंद्र मेहता यांनी आपल्या कार्यालयात शनिवारी सत्कार केला.
यापूर्वी देखील बेळगाव येथे जून २०१७ मध्ये आयोजित स्केटिंगच्या ह्यूमन चैन (मानवी साखळी) प्रकारात अमन विक्रम राऊत, प्रथम अभयसिंग ओस्तवाल, भव्य कल्पेश सोनी, क्रिश जतीन मायावंशी, सावित दिनेश बंगेरा, विजय मंगेश चापवाले या सहा स्थानिक स्केटिंगपटूंनी सलग ५१ तास स्केटिंग करून जागतिक विक्रमाची नोंद केली होती. त्याची नोंदसुद्धा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्यानंतर जागतिक विक्रमाची ही दुसरी वेळ ठरली आहे. यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यंदा २४ व २५ आॅक्टोबर २०१७ रोजी बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंगमार्फत जागतिक स्तरावरील कुकिज् डंकिंग रिले स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी मीरा-भार्इंदर स्केटिंग स्कूलचे १२ बाल स्केटिंगपटूंची निवड करण्यात आली होती. त्यात ईशान सावंत, अनुशा कटारिया, जस त्रिवेदी, जान्हवी सोनावणे, दृष्टी जोशी, प्रहश पाठक, जेझेल फर्नांडिस, शॉन विजी, यशवर्धन जैन, गौरव सिंह, युग झुनझुनवाला व अद्वैत पिल्ले यांचा स्केटिंगपटूंचा समावेश होता. या १२ जणांच्या चमूने लाँगेस्ट बिस्किट (कुकिज् डंकिंग रिले) प्रकारात त्यांनी सलग २६ तासांचे स्केटिंग केले.
या स्पर्धेत भारतातून एकूण ३९५ स्पर्धकांनी सहभाग होता. या स्पर्धेतील क्लॉक व अॅण्टीक्लॉक व्हाईज् स्केटिंगमधील कुकीज् डंकिंग रिले प्रकारात टेबलावर दुधाने भरलेल्या ग्लास ठेवला जातो. त्याच्या शेजारीच बिस्कीटे अथवा कुकिज् ठेवल्या जातात. या कुकिज्, स्पर्धकांनी क्लॉकव्हाईज-अॅण्टीक्लॉकव्हाईज स्केटींग करुन त्या दुधाच्या ग्लासात डिप करून दुधाचा एकही थेंब खाली न सांडता खायच्या असतात. यातील अॅण्टीक्लॉकव्हाईज प्रकार कठीण असतो. मात्र तो सहजपणे पूर्ण करीत या स्केटिंगपटूंनी यापूर्वी अमेरिकेच्या नावे असलेल्या १२ तासांच्या विक्रमाला मागे टाकले. त्यांनी तब्बल दुप्पट तासांहून अधिक दोन तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हरियाणातील द्रोणाचार्य पारितोषिक विजेते ए. डी. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती.