पाटकर रोडवरील स्कायवॉकचा जिना लवकरच होणार खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:55 AM2019-05-02T00:55:06+5:302019-05-02T00:55:11+5:30
लाद्यांचे काम पूर्ण : आठवडाभरापासून सुरू होती दुरुस्ती
डोंबिवली : पूर्वेतील रेल्वेस्थानकानजीकच्या पाटकर रस्त्यावर उतरणाऱ्या स्कायवॉकच्या जिन्याच्या लादीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जिन्यावरील लाद्या तुटल्याने हे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी आठवडाभर बंद असलेला हा जिना लवकरच पादचाऱ्यांसाठी खुला होणार असून रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
कंत्राटदाराने नव्या लाद्या जिन्यासमोरच ठेवल्याने पादचाऱ्यांना तेथून मार्ग काढताना त्रास झाला होता. त्यासंदर्भात ‘हॅलो ठाणे’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने त्याची दखल घेत जिन्यांच्या डागडुजीचे काम वेगाने हाती घेण्यात आले होते. लाद्यांचे हे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यापूर्वी तुटलेल्या लाद्यांच्या जिन्यांवरून जाताना पादचाºयांना त्रास व्हायचा, ती गैरसोय आता दूर होणार आहे. त्यामुळे पादचाºयांना दिलासा मिळणार आहे. सध्या काही पादचाºयांना, रेल्वे प्रवाशांना पाटकर रस्त्यावरून, उर्सेकरवाडीमधून मार्ग काढावा लागत आहे. तसेच रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत असल्याने तेही हा जिना सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
लाद्यांचे काम दोन दिवसांपूर्वीच झाले आहे. नवीन काम असल्याने त्यावर पाणी मारणे आवश्यक असून आणखी दोनतीन दिवसांनंतर हा मार्ग खुला केला जाईल. - प्रशांत भुजबळ, उपअभियंता, केडीएमसी