अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशाच्या मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 08:09 PM2019-08-07T20:09:09+5:302019-08-07T20:11:37+5:30
क्रांती डिपार्टमेंट रस्त्यामागे ही घटना घडली असून घरात आई आणि मुलगा राहत होते.
डोंबिवली - मुंबईत डोंगरी येथे इमारत कोसळून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता डोंबिवली पश्चिमेकडील अतिधोकादायक गोडसे इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना आज घडली आहे. क्रांती डिपार्टमेंट रस्त्यामागे ही घटना घडली असून घरात आई आणि मुलगा राहत होते. स्लॅब कोसळल्याने जखमी झालेल्या विकास फडके (५२) यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डोंबिवली पश्चिम येथील गोडसे इमारत ही दोन मजली इमारत असून ती अतिधोकादायक इमारत आहेत. त्यात राहणारे विनायक फडके हे जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असता ते मृत असल्याचे घोषित करण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली. या घटनेस दुजोरा देत केडीएमसी अधिकारी यांनी मृत व्यक्तीचे नाव विकास फडके असल्याचे सांगितले. महात्मा फुले रस्त्याच्या शुभारंभाला असलेल्या गोडसे या दोन मजल्याच्या अतिधोकादायक इमारतीत राहत्या घरातील स्लॅब कोसळून विकास फडके या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. गोडसे इमारत ही अतिधोकायक असून त्या दोन मजल्यामद्ये दोन भाडेकरू अनेक वर्षे वास्तव्याला होते. त्यातील फडके यांच्या घरी ते आणि त्यांची वयोवृद्ध आई रहात होती. स्लॅब पडण्याच्या दुर्घटनेत मुलगा मयत झाला असून वयोवृद्ध आई मात्र सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. फडके यांच्या अंगावर स्लॅब पडल्यानंतर ते जखमी झाले आणि त्या अवस्थेत त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असता तेथे ते मयत असल्याचे घोषित करण्यात आले.
घटनास्थळी तातडीने महापालिकेचे आपत्कालीन पथक, स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक, अग्निशमन यंत्रणा आदी पोहोचल्या असून प्रभाग अधिकारीही ज्ञानेश्वर कंकरे उपस्थित होते. अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यासंदर्भात महापालिका कमी पडत असल्याची टीका नागरिकांमधून व्यक्त।झाली. या इमारतीमध्ये तळ मजल्यावर 10 दुकाने असून त्यांनाही त्वरित खाली करण्यात यावे या संदरभात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या मजल्यावरील एका कुटुंबाला मात्र तातडीने खाली उतरवण्यात आले आहे.
डोंबिवली - अतिधोकायक इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना पश्चिमेकडील क्रांती डिपार्टमेंट रस्त्यामागे घडली असून एक व्यक्ती जखमी https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2019