ठाणे जि.प.ने बांधलेल्या खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या इमारतीचा स्लॅब पहिल्याच पावसात गळतोय
By सुरेश लोखंडे | Published: July 27, 2023 07:15 PM2023-07-27T19:15:34+5:302023-07-27T19:15:42+5:30
या गळक्या शाळेमुळे विद्याथ्यार्ंचे हाल सुरू झाले आहे.
ठाणे: येथील जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियातून शहापूर तालुक्यातील खर्डी येथे अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्र्टीय शाळा क्र.१ चे जी प्लस वनची इमारत बांधण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२२-२३ मध्ये मंजूर झालेल्या या इमारतीचे काम जानेवारीमध्ये सुरू करण्यात आले. काेट्यावधी रूपये खर्चुन बांधकाम केलेल्या या इमारतीचा स्लॅब आताच्या पहिल्याच पावसाळ्यात गळू लागला आहे. त्यामुळे या ठेकेदारासह संबंधीत अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी येथील शाळेच्या शिक्षकांसह पालकांकडून होत आहे.
या गळक्या शाळेमुळे विद्याथ्यार्ंचे हाल सुरू झाले आहे. या इमारतीचे काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यामुळे शाळेचा स्लॅब पहिल्याच पावसात पूर्ण गळायला लागला आहे. या धोकादायक इमारती विषयी पालकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहे. सध्या तरी ही शाळा ठेकेदाराने शाळेच्या ताब्यात दिली नसून तोही फरार झालेला असल्याचे येथील शाळेच्या शिक्षकांकडून लोकमतला सांगण्यात आले.
येथील जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियानाच्या अभियंत्यांने या इमारत बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अर्थ कारण केल्याचे बाेलले जात आहे. शाळेतील मुलांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न संबंधीत अभियंता व ठेकेदाराने केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणील पालकांकडून करण्यात येत आहे.