उल्हासनगरातील ओम शिवगंगा इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारत रिकामी असल्याने जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:15 PM2020-08-30T17:15:18+5:302020-08-30T17:15:45+5:30
उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरातील लालचक्की परिसरात ओम शिवगंगा अपार्टमेंट ही पाच मजली इमारत महापालिकेने धोकादायक घोषीत करून दोन वर्षां पूर्वी खाली केली होती.
उल्हासनगर : कॅम्प नं-४ लाळचक्की परिसरातील ओम शिवगंगा इमारतीच्या पिलर्सला तडे जावून एका बाजूचे स्लॅब आज सकाळी पडले. इमारत खाली असल्याने जीवितहानी टळली असून सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने इमारती भोवती लोखंडी बॅरेकेट्स बसविले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरातील लालचक्की परिसरात ओम शिवगंगा अपार्टमेंट ही पाच मजली इमारत महापालिकेने धोकादायक घोषीत करून दोन वर्षां पूर्वी खाली केली होती. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इमारती मध्ये काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. तसेच इमारतीच्या पिलर्सला तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी महापालिका अग्निशमन दलाला माहिती दिल्यावर अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी इमारतीची पाहणी केली असता, पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथा, तिसरा, दुसरा व पहिल्या मजल्यावरून खाली पडला. इमारत केंव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त होत असून अग्निशमन दलाच्या जणांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारती भोवती लोखंडी बैरेकेट्स लावण्यात आला असून आजूबाजूचा परिसर पूर्णपणे खाली केला आहे.
महापालिकेने एकून १६० इमारती धोकादायक घोषीत केल्या असून त्यापैकी ३० इमारती अतिधोकादायक आहेत. अतिधोकादायक इमारती पैकी काही इमारती जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी सर्वात केली होती. मात्र संततधार पावसामुळे इमारत पाडकाम कारवाई थांबली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ओम शिवगंगा इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी केली आहे.