स्लॅबचा भाग कोसळून महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:32 AM2019-06-17T00:32:47+5:302019-06-17T00:34:13+5:30
सुदैवाने या दुर्घटनेत मोठी हानी झाली नसली तरी, येथे वास्तव्य करणारी कुटुंबे या घटनेने धास्तावली असून त्यामुळे पोलिसांच्या जीर्ण वसाहतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य (शासकीय) रूग्णालयासमोरील जीर्णावस्थेत असलेल्या पोलीस लाईनमधील एका इमारतीमधील सागरे कुटूंबीय राहत असलेल्या घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळून वर्षा सागरे (३०) या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी हानी झाली नसली तरी, येथे वास्तव्य करणारी कुटुंबे या घटनेने धास्तावली असून त्यामुळे पोलिसांच्या जीर्ण वसाहतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डागडुजीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ टोलवाटोलवी सुरु असल्याचा आरोप आता उघड-उघड केला जात आहे.
रुग्णालयानजीक असलेल्या पोलीस लाइनची वसाहत अतिशय जुनी असून, या वसाहतीतील अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बी-३४ या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रमेश सागरे यांच्या घरातील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. त्यावेळी घरात असलेल्या वर्षा सागरे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मलमपट्टी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. ही इमारत तळ अधिक चार मजली असून तेथे ७२ कुटुंबे वास्तव्य करतात.
या घटनेची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र,ही वसाहत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला.