गृहसंकुलाच्या बॅनरबाजीसाठी ३५ झाडांची कत्तल, स्थानिकांनी एकास पकडले, अन्य तिघेजण पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:40 PM2017-09-28T19:40:13+5:302017-09-28T19:40:43+5:30
डोंबिवली - येथील नजीकच्या बदलापूर पाईपलाईन रोडवरील दुतर्फा तिर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी लावलेल्या ३५ झाडांची कत्तल करण्यात आल्याची बाब बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. एका गृहनिर्माण संकुलाच्या जाहीरातीकरीता केलेल्या बॅनरबाजीसाठी ही झाडांची कत्तल करण्यात आली असून स्थानिक ग्रामस्थांनी झाड तोडणा-या एकाला पकडून मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे तर अन्य तीघेजण पसार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा हा संदेश देण्यासाठी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने चार वर्षापुर्वी श्री सदस्यांकडून बदलापूर पाईपलाईन रोडवरील कोळेगाव ते अंबरनाथ मार्गावर दुतर्फा तब्बल साडेचारशे ते पाचशे झाडे लावण्यात आली आहेत. श्री सदस्यांकडून या झाडांची निगा राखली जात असताना सद्यस्थितीला सुमारे १० फूटार्पयत वाढलेल्या यातील ३५ झाडांवर गेल्या दोन दिवसात कु-हाड चालविण्यात आल्याने संबंधितांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान झाडांच्या हा कत्तलीचा प्रकार हेदूटणो परिसरातील स्थानिकांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चौघांकडून झाडे तोडण्याचा प्रकार सुरू होता. यातील एकाला पकडण्यात आले इतर तीघांनी पलायन केले. पकडण्यात आलेल्याला चोप देत मानपाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्याच्यावर कारवाई करण्याचे सोडुन पोलिसांनी चोपणा-या ग्रामस्थांनाच धारेवर धरले. याची माहीती मिळताच गुरूवारी सकाळी शिवसेना सभागृहनेते राजेश मोरे, भाजपाचे डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक महेश पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. एमआयडीसीच्या अधिका-यांनी देखील यावेळी उपस्थिती लावली होती. त्यांनीच दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हयाची नोंद केली आहे. दरम्यान झाडांची कत्तल झालेल्या परिसराला सायंकाळी वन विभागाच्या अधिका-यांनी देखील भेट दिली.
श्री सदस्यांकडून पालकमंत्र्यांना दूरध्वनी: राज्यमंत्र्यांनीही घेतली दखल
या घटनेमुळे संतप्त झालेल्या श्री सदस्यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनी करून त्यांना याबाबत माहीती दिली. शिंदे यांनी देखील स्वत: पोलिस ठाण्याला संपर्क साधून वरीष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस अधिका-यांसमवेत बैठक घेतली. झाडांची कत्तल करण्याचा प्रकार गंभीर असून याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी श्री सदस्य असलेले भरत म्हसकर, आनंद पाटील, वर्गीस म्हात्रे, सदानंद पाटील आदिंनी केली. आजच्याघडीला शासनाकडून वृक्षारोपणावर सरकार लाखो रूपये खर्च करीत आहे परंतू आमचे सदस्य कोणताही मोबदला न घेता स्वत:च्या पैशांनी आठवडयातील एक दिवस त्या झाडांची निगा राखतात, पाणी टाकणो, आजुबाजुचे गवत काढणो आदि कामे करत असल्याची माहीती सदस्यांकडून देण्यात आली.