न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल; आरोपीस दोन वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 03:25 AM2020-12-13T03:25:50+5:302020-12-13T03:26:03+5:30
२९ जानेवारी, २०१९ रोजी अश्रफला सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आणले होते. न्यायाधीश एच.जे. पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता, अश्रफने गुन्ह्याची कबुली दिली.
ठाणे : न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या एका आरोपीला शुक्रवारी ठाणे न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अश्रफ वैदुजमा अंसारी असे या आरोपीचे नाव आहे.
२९ जानेवारी, २०१९ रोजी अश्रफला सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आणले होते. न्यायाधीश एच.जे. पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता, अश्रफने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर, न्यायाधीशांनी ‘तू आणखी सहा महिने कारागृहात राहण्यास आणि दंड भरण्यास तयार आहेस का?’ अशी विचारणा केली. याच गोष्टीचा राग आल्याने, त्याने पायातील चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली, परंतु न्यायाधीश प्रसंगावधान राखून बाजूला झाले. नंतर पुन्हा दुसरी चप्पल हातात घेऊन ती न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. मात्र, ही चप्पल एका महिला वकिलाला लागली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अश्रफविरुद्ध गुन्हा दाखल केला. एकूण सहा साक्षीदार तपासले. साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश पी.एम. गुप्ता यांनी आरोपीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.