दिवाळीच्या फराळावर मंदीचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:49 AM2019-10-18T00:49:31+5:302019-10-18T00:49:47+5:30
साहित्य महागले : तयार फराळाचा भाव स्थिर, मात्र मागणी रोडावली
- जान्हवी मोर्ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरात नोकरदार महिलांना घरी फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे दिवाळीत तयार फराळखरेदीवर त्यांचा भर असतो. यंदा साहित्य महागूनही तयार फराळाच्या किमती स्थिर आहेत; मात्र तरीही फराळासाठी मागणी नोंदवण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने फराळविक्रेते चिंतेत असून त्यांनाही बाजारातील मंदीचे चटके सहन करावे लागत आहेत.
फराळविक्रेते सुनील शेवडे म्हणाले की, सगळीकडे आर्थिक मंदीचे वातावरण आहे. लोकांमध्ये तयार फराळखरेदी करण्यात निरुत्साह दिसत असून परदेशातून ८० टक्के, तर स्थानिक पातळीवर केवळ ६० टक्केच बुकिंग झाले आहे. यंदा सीकेपी करंजीला मागणी अधिक आहे. या करंजीला अधिक घड्या पडतात आणि त्या तुलनेने लुसलुशीत असतात. साधी करंजी ४०० रुपये किलोने, तर सीकेपी करंजीला ६०० रुपये किलोचा भाव आहे. फराळाच्या साहित्यात मागच्या वर्षीपेक्षा यंदा फक्त खोबऱ्याच्या किमतीत घट झाली आहे. मात्र, इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तरीही, विक्रेत्यांनी फराळाच्या किमतीत मंदीमुळे वाढ केलेली नाही. डोंबिवलीतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपरकडील पूल बंद असल्याने छोट्या विक्रेत्याकडे फराळ पोहोचवताना आम्हाला त्रास होत आहे. वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. यंदा फराळात ठेपला पुरी आणि जवस पुरी वेगळी बनवली आहे. फराळासोबत अनेक जण ठेपला आणि जवस पुरीचेही बुकिंग करत आहे.
श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की, जागतिक मंदीमुळे फराळाला मागणी कमी आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होऊनही आम्ही फराळाच्या किमतीत वाढ केली नाही. यंदा सर्वत्र निवडणुकीचा माहोल आहे. दिवाळी महिनाअखेरीस आल्यामुळे नागरिकांनी खरेदीच सुरू केलेली नाही. तसेच, निवडणुकीमुळे कामगारवर्गही प्रचारातील कामाला पसंती देतो. त्यामुळे फराळ तयार करण्यासाठी कामगार मिळणेही कठीण झाले आहे. कामगारांना तिकडे मानधन आणि दोन्ही वेळचे जेवण मिळत असल्याने ते तिकडे अधिक आकर्षित होतात. यंदा फक्त २५ टक्के फराळाचे बुकिंग झाले आहे. फराळात वेगळे काही केले नाही. दिवाळीच्या सुटीत लोक अनेकदा बाहेर जातात. त्यामुळे फराळाला मागणी कमी झाली आहे, असेही सांगितले
असे आहेत अंदाजे भाव
भाजणीची चकली ४०० रुपये किलो, कडबोळी ४०० रुपये, तिखट शेव, लसूण शेव ३२० रुपये, पातळ पोहा चिवडा ३०० रुपये, फुलवलेला पोहा चिवडा ३०० रुपये, कोथिंबीर चिवडा ३४० रुपये, मसाला कोन ३२० रुपये, बेसन लाडू (साजूक तुपातील) सहा नग १२० रुपये, अनारसे पाच नग १०० रुपये, कानवले १० नग २४० रुपये, शंकरपाळे (गोडे) ३४० रुपये, चिरोटे एक पॅकेट २०० ग्रॅम ११० रुपये आहे. दिवाळी परदेशी फराळात हॅम्पर ए आणि स्टुडंट हॅम्पर बी असे दोन भाग केले आहेत. त्यात ‘हॅम्पर ए’साठी सहा हजार ९९९ रुपये, तर ‘हॅम्पर बी’साठी तीन हजार ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
परदेशात मंगळवारी फराळ पाठवणार
परदेशात २२ आॅक्टोबरपर्यंत फराळ पाठवता येणार आहे. आमच्याकडे तयार फराळ आणि घरगुती फराळ असे दोन्ही प्रकार पाठवण्याची सोय आहे. त्यामुळे अस्सल घरगुती फराळाची चवही परदेशात घरबसल्या चाखता येते, असेही शेवडे म्हणाले.