झोपडपट्टी भागाला मिळणार एका रुपयात एक लीटर शुध्द पिण्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 05:55 PM2017-11-16T17:55:13+5:302017-11-16T17:56:24+5:30
झोपडपटटी भागाला आता अवघ्या एका रुपयात एक लीटर पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. महापालिकेने झोपडपट्टी भागासाठी की आॅक्सची योजना पुढे आणली आहे.
ठाणे - ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुध्द पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कि आॅक्स या पध्दतीचा वापर करुन त्याठिकाणी एटीएम कार्ड प्रमाणे कार्ड दिले जाणार असून ते स्वॉइप केल्यावर जेवढे पाणी हवे आहे, तेवढे उपलब्ध होणार आहे. परंतु यामुळे टँकर लॉबीला आळा बसणार असून टँकरपेक्षा कमी दरात हे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार एक लीटरमागे पालिकेला सहा पैसे मिळणार आहे. तर संबधींत संस्थेकडून हे पाणी रुपयाला एक लीटर या प्रमाणे विकले जाणार आहे.
ठाणे शहर दिवसेंदिवस विस्तारत असून जिथे जागा मिळेल तिथे नागरी वस्ती निर्माण होत आहे. परिणामी पालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या नागरी सुविधांवर देखील याचा ताण पडत असून काही परिसरात तर पाण्यासारखी मुलभूत सुविधा पुरवणे देखील पालिकेला शक्य नाही. या परिसरात पालिकेच्या पाइपलाईन टाकणे देखील अशक्य असल्याने नागरिकांना जास्त पैसे देऊन टँकरचे पाणी वापरण्याशिवाय पर्याय नाही. महासभेत देखील या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अशा परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी कि- आॅस्क या वितरण व्यवस्थेचा पर्याय पालिकेने शोधून काढला आहे. त्यानुसार पीपीपी तत्वावर ही प्रणाली विकसित केली जाणार असून पाच वर्षांसाठी हा प्रकल्प खाजगी संस्थेला चालविण्यासाठी दिला जाणार आहे. परंतु यासाठी जे की- आॅक्स (पाण्याच्या छोट्या टाक्या) वापरले जाणार आहेत, ते संबधींत संस्थेने उपलब्ध करायचे आहेत.
- काय आहे कि- आॅस्क?
ज्या भागात पाणी पुरवठा करणे पालिकेला शक्य नाही अशा भागात हे कि- आॅस्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये एटीएमसारखी केबिन उभारण्यात येणार असून त्यामागे पाण्याची टाकी बसवण्यात येणार आहे. जे नागरिक कि- आॅस्क चा वापर करणार आहेत त्यांना एक कार्ड दिले जाणार असून हे कार्ड स्वाइप केल्यानंतर नागरिकांना पाणी भरता येणार आहे. जेवढे पाणी भरले तेवढेच बिल आकारले जाणार असल्याने महागड्या टेंकरचा भार नागरिकांना सोसावा लागणार नाही.
त्यानुसार या संदर्भातील महापालिकेला मिळणाºया रॉयल्टीचा प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार साधे शुध्द पाण्याच्या लीटरमागे पालिकेला सहा पैसे मिळणार आहेत. तर थंडगार एक लीटर पाण्यामागे ८ पैसे पालिकेला मिळणार आहे.