लहान धरणांचे सर्वेक्षण कागदावरच
By Admin | Published: April 20, 2016 02:11 AM2016-04-20T02:11:01+5:302016-04-20T02:11:01+5:30
ठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे.
मुरलीधर भवार, कल्याण
ठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणीच अजूनही सरकारने केलेली नाही. ही अंमलबजावणी वेळीच झाली असती तर आज जिल्ह्यातील पाण्याची समस्या इतकी बिकट झाली नसती, अशी माहिती कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व भाजपा आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.
कथोरे यांनी सांगितले की, २००५ ते २००९ दरम्यान ते कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वत:चा जलसाठा तयार करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेने धरणासाठी प्रस्ताव पाठविला नाही. आज जिल्ह्यातील नागरिकांना ३० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. तर ३५ टक्के पाण्याची गळती आहे. प्रत्यक्षात नागरिकांना ३५ टक्केच पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावरच जिल्ह्यातील दीड कोटी नागरिकांची तहान भागविली जात आहे. पाण्याची गळती रोखल्यास नागरिकांना जादा पाणी मिळू शकेल. गळती रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न नाहीत. सरकारी यंत्रणाही ढिम्म आहेत.
जिल्ह्यात लहान धरणे तयार करण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहेत, असे ते म्हणाले. लहान धरणाचा जलसाठा १८ ते ३० दशलक्ष लिटर इतका असतो. त्यातून आसपासच्या नागरिकांची तहान भागू शकते. परिणामी उल्हास नदीतून पाणी उचलल्यामुळे पडणारा ताण कमी होईल. तसेच जास्तीचे पाणी टंचाईग्रस्त भागाला देता येईल. स्थानिक स्वराज्य संस्था नव्या इमारतींच्या बांधकामाला परवानगी देतात. मात्र, या संस्था तेथे राहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याचे नियोजन करीत नाही. त्यात बेकायदा बांधकामे वाढत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. पाणीचोरांवरही कारवाई होत नाही. त्याची झळ जिल्ह्याला बसते आहे.
कोंढाणेचे नियोजन फसले, पोशीर भूसंपादनाच्या कचाट्यात
कोंढाणे धरणाचे नियोजन फसले आहे. कर्जतनजीकचे पोशीर धरण भूसंपादनाच्या कचाट्यात सापडले आहे. मोठ्या धरणांसाठी वनविभाग व पर्यावरण परवानग्या मिळणे कठीण होते. किमान लहान आकाराची धरणे मार्गी लागल्यास त्यांच्या उभारणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी लागतो असे कथोरे यांनी सांगितले.
सह्याद्रीच्या फूटहिल्स समजल्या जाणाऱ्या मलंगगडाच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी कल्याण खाडीला मिळते. तेथे कुशीवली धरणाचा प्रस्ताव आहे.
बदलापूर येथे भोज धरणाचा प्रस्ताव आहे. तसेच इंदगावचे धरण प्रस्तावित आहे. चिंचवली येथेही धरणे होऊ शकते. या लहान धरणांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची अंमलबजावणी तत्कालीन आघाडी सरकारने केली नाही.