ठाण्यात सुरू झाली लघुन्यायवैद्यक प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:58 PM2019-12-16T22:58:43+5:302019-12-16T23:09:51+5:30

न्यायवैद्यक विभागामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षाही झालेली असल्यामुळे पोलिसांनी न्यायवैद्यक विभागाकडून आलेला परीक्षणाचा अहवाल न्यायालयीन कागदपत्रांमध्ये न जोडण्यासारखा हलगर्जीपणा करू नये, असा सल्ला सोमवारी राज्याचे न्यायिक व तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आपल्याच पोलिसांना दिला.

A small forensic laboratory started in Thane | ठाण्यात सुरू झाली लघुन्यायवैद्यक प्रयोगशाळा

तपासातही येणार गती

Next
ठळक मुद्देन्यायिक व तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळेंच्या हस्ते उद्घाटनठाणे आणि पालघर जिल्हयातील ७३ पोलीस ठाण्यांना होणार फायदातपासातही येणार गती

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक विभागाकडून आलेला परीक्षणाचा अहवाल न्यायालयीन कागदपत्रांमध्ये तपास अधिकाऱ्यांकडून जोडलाच जात नाही. केवळ २५ ते ३० टक्के अहवाल हे विलंबाने गेलेले असतात. मग, असे अहवाल (सीए) न जोडण्यामागे पोलिसांचे आरोपींबरोबर संगनमत तर नाही ना? अशी शंका येते किंवा त्यांच्याकडून तो हलगर्जीपणा होतो. न्यायवैद्यक विभागामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षाही झालेली असल्यामुळे पोलिसांनी असा हलगर्जीपणा करू नये, असा सल्ला सोमवारी राज्याचे न्यायिक व तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आपल्याच पोलिसांना दिला.
ठाण्यात चरईतील महानगर टेलिफोन निगमच्या सहाव्या मजल्यावर सोमवारी राज्यातील पाचव्या लघुन्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन नगराळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात शासनाने २०१८ मध्ये ज्या पाच लघुन्यायवैद्यक प्रयोगशाळा मंजूर केल्या, त्यातील रत्नागिरी, धुळे आणि चंद्रपूर या कार्यान्वित झाल्या आहेत. ठाण्यात चौथी प्रयोगशाळा सुरू झाली असून लवकरच सोलापूरमध्ये पाचवी प्रयोगशाळाही सुरूकेली जाणार आहे. लघुप्रयोगशाळेमुळे गडचिरोलीच्या पोलिसांना नागपूरला येण्याची गरज नाही. त्यांना चंद्रपूरला ही सुविधा मिळाली. त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघरच्या पोलिसांनाही आता न्यायवैद्यक पुरावे गोळा करून त्याच्या परीक्षणासाठी मुंबईच्या कलिना येथे येण्याची गरज नाही. दूरवरचा प्रवासही टळला आणि हे पुरावे हाताळण्याचा त्रासही कमी झाला आहे. या प्रयोगशाळेमार्फत रक्त, लघवी, वीर्य अशा जैविक बाबी तसेच विषबाधेचीही तपासणी केली जाणार आहे. लवकरच मद्यार्काच्याही तपासणीचा विभाग याठिकाणी सुरू केला जाणार आहे. यातून अल्कोहोलचे प्रमाण आणि टक्केवारीही तपासली जाईल. अनेकदा सीए (न्यायवैद्यक परीक्षण) अहवालाअभावी गंभीर गुन्ह्यांच्या तपासावरही त्याचा परिणाम होतो. १०० पैकी २५ टक्के प्रकरणात सीए विभागाकडून अहवाल गेलेला नसतो. पण, ७५ टक्के प्रकरणांत अहवाल जाऊनही तो जोडला गेलेला नसतो. मग, पोलिसांचे आरोपीबरोबर संगनमत तर नाही ना? अशी शंका उपस्थित होण्याला वाव मिळतो. त्यामुळे पोलिसांनी हलगर्जीपणा न करता, हा अहवाल खटल्याच्या कागदपत्रांसाठी पुरावा म्हणून जोडण्याचा कळकळीचा सल्ला नगराळे यांनी पोलिसांना दिला.
एखाद्या प्रकरणाच्या निकालानंतर संबंधित मुद्देमाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून परत घेऊन जाणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. व्हिसेरा कसा ठेवावा, परिस्थितीजन्य पुराव्यासाठी नमुने कसे गोळा करावेत, याचे ज्ञानही पोलिसांनी अवगत करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. पुण्याच्या एका केसमध्ये आरोपींनी खाल्लेल्या सफरचंदाच्या नमुन्याच्या आधारेही कशी शिक्षा लागली, याचेही त्यांनी यावेळी उदाहरण दिले.

पोलीस आयुक्तांना पुणेरी टोला
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या भाषणामध्ये या प्रयोगशाळेच्या जागेची विचारणा करण्यासाठी या विभागाचे अधिकारी आपल्याकडे आले होते. पोलिसांनी आता काय काय कामे करायची? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. याला नगराळे यांनीही पुणेरी भाषेतच घरात लग्नकार्य असल्यावर सर्वांनीच मिळेल ती कामे करावी लागतात. तसेही या प्रयोगशाळेचा ठाणे पोलिसांनाच सर्वाधिक उपयोग होणार असल्याचे सांगून त्यांना पुणेरी टोमणा दिल्याने सभागृहात एकच हशा पिकला
................

 राज्यात आठ ठिकाणी प्रयोगशाळा
पोलिसांना व्हिसेरा, रक्तनमुने आणि इतर न्यायवैद्यक पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत मुंबईपर्यंत आणण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्या आता दूर होतील. सुरुवातीला केवळ मुंबईतच ही प्रयोगशाळा होती. आता राज्यभरात आठ प्रयोगशाळा सुरू झाल्या असून सायबर गुन्ह्यांच्याही तपासाची याठिकाणी लवकरच सुविधा सुरूहोईल, असे मुंबईच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. कृष्णा कुलकर्णी यांनी सांगितले. इंद्राणी मुखर्जी प्रकरणातही मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेची भूमिका महत्त्वाची होती, असेही ते म्हणाले.
*तपासात प्रयोगशाळेचे योगदान महत्त्वाचे
न्यायवैद्यक प्रयोगशाळा म्हणजे तपास प्रक्रियेत न्यायाचा मोठा स्तंभ असून न्यायव्यवस्थेवर जो परिणाम होतो, त्याचा समाजावरही परिणाम होतो. शक्ती मिल प्रकरणात सीए अहवालामुळे आरोपींना फाशी झाल्याचे ठाणे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक म्हणाले. तर, फिर्यादी, साक्षीदार काय बोलेल? त्यापेक्षा न्यायवैद्यक पुरावा महत्त्वाचा ठरत असल्याने त्याचे मोठे योगदान असल्याचे पोलीस आयुक्त फणसळकर म्हणाले. पोलीस आणि शासनाची विश्वासार्हता जपण्याचे काम सीए विभागाने केले आहे. त्यामुळे ठाण्याची ही प्रयोगशाळा गुन्हेगारांची कर्दनकाळ ठरून त्याचा पोलिसांना आधार मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
*अधिकाऱ्यांचा सत्कार
यावेळी ही प्रयोगशाळा उभारण्यात मोलाचे सहकार्य करणारे डॉ. हेमंत कुलकर्णी, ठाण्याच्या लघुन्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या सहायक संचालक हेमंतिनी देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेलार, सानप, महानगर टेलिफोन निगमचे कांबळे आणि दिवाकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
 

Web Title: A small forensic laboratory started in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.