उत्पन्नवाढीत छोट्या विभागांचेही उड्डाण
By admin | Published: April 11, 2016 01:27 AM2016-04-11T01:27:17+5:302016-04-11T01:27:17+5:30
ठाणे महापालिकेने इतिहासात प्रथमच सर्वात जास्त वसुली करून प्रत्येक विभागाने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिकचे म्हणजेच तब्बल ५२६ कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे
ठाणे : ठाणे महापालिकेने इतिहासात प्रथमच सर्वात जास्त वसुली करून प्रत्येक विभागाने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिकचे म्हणजेच तब्बल ५२६ कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दरवर्षी तोट्यात असलेल्या छोट्या २० विभागांनीदेखील यंदा अपेक्षेपेक्षा अधिकची कमाई करून एक नवे रेकॉर्ड केले आहे. या छोट्या विभागांनी यंदा ८.३९ कोटींचे अधिकचे उत्पन्न मिळवून एकूण ३९.७१ कोटींची वसुली केली.
मागील दोन वर्षे पालिकेचे उत्पन्न जकात आणि एलबीटीच्या गर्तेत अडकले होते. कर्मचाऱ्यांचे पगार निघतील अथवा नाही, याबाबतही शंका उपस्थित झाल्या होत्या. परंतु, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेतील प्रत्येक विभागाला टार्गेट दिले. प्रत्येक विभागाच्या नियमित बैठका घेऊन वसुली न केल्यास कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार, पालिकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र त्यात ५२६ कोटींची वाढ करून पालिकेला यंदा १९०२.७५ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे उत्पन्नात मोठ्या विभागांनी बाजी मारली असली तरी छोट्या विभागांनीदेखील खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या गडकरी रंगायतन आणि काशिनाथ घाणेकर या दोन नाट्यगृहांमधून यंदा २.७० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ते ३३ लाखांनी वाढले आहे. दादोजी क्र ीडा प्रेक्षागृहांचे उत्पन्नही ६९ लाखांवरून १.०८ कोटींवर गेले आहे. तजोरीतली छोट्या कामांमधील संकीर्ण जमासुद्धा १०.७ कोटींवरून १२.७१ कोटींवर गेली आहे. (प्रतिनिधी)