स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे - नारायण पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 12:32 AM2020-12-08T00:32:20+5:302020-12-08T00:32:38+5:30

Thane News : स्मार्ट सिटी कंपनीतून ४२ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी क्रिसिल रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन व पॅलाडियम कन्सल्टिंग इंडिया कंपनीची नियुक्ती केली आहे.

Smart City Consulting Companies - Narayan Pawar | स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे - नारायण पवार

स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे - नारायण पवार

Next

ठाणे - ठाणे शहरात स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाला असताना, स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपन्यांचे उखळ मात्र पांढरे झाले आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत स्मार्ट सिटी कंपनीत १ कोटी ८८ लाख ७५ हजार १७६ रुपये प्रशासकीय खर्चाची नोंद झाली आहे. मात्र, त्यापैकी तब्बल १ कोटी ४० लाख रुपये दोन सल्लागार कंपनीच्या तिजोरीत जमा झाले. या प्रकाराला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

स्मार्ट सिटी कंपनीतून ४२ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी क्रिसिल रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन व पॅलाडियम कन्सल्टिंग इंडिया कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांना एप्रिलपासून नोव्हेंबर, २०२० पर्यंत बिले देण्यात आली आहेत. त्यात क्रिसिलला १ कोटी १६ लाख ५४ हजार रुपये १६९ रुपये व पॅलाडियम कंपनीला २५ लाख ६७ हजार २१९ रुपये देण्यात आले. या दोन्ही कंपन्यांच्या तिजोरीत अवघ्या आठ महिन्यांत १ कोटी ४२ लाख रुपये जमा झाले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे २५ मार्चपासून स्मार्ट सिटीचे काम ठप्प झाले होते, पण काही अंशी व्यवहार सुरू झाल्यानंतर १६ जुलै रोजी क्रिसिल कंपनीला तातडीने एकाच वेळी तीन बिलांचे ४१ लाख रुपये वितरित करण्यात आले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. 

‘दर तीन महिन्यांनी खर्च जाहीर करावा’
शासकीय खर्चातून सल्लागार कंपनीच्या तुंबड्या भरण्याचा उद्योग स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू आहे, असा आरोप करीत पवार यांनी स्मार्ट सिटीच्या पारदर्शक कारभारासाठी दर तीन महिन्यांने सविस्तर खर्च वेबसाईटवर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. स्मार्ट सिटीतील ४२ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांचे कार्यादेश २०१८ मध्ये देण्यात आले. त्यापैकी बहुतेक प्रकल्पांचे काम १० ते १५ टक्क्यांपर्यंतच झाले आहे. प्रकल्पातील अडचणी दूर झाल्या नाहीत. मात्र, सल्लागार कंपन्यांना दरमहा पैसे अदा केले जात आहेत, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 

Web Title: Smart City Consulting Companies - Narayan Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे