ठाणे जिल्ह्यातील गांवखेड्यांच्या २८ ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्मार्ट ग्रंथालये
By सुरेश लोखंडे | Published: January 25, 2024 04:51 PM2024-01-25T16:51:45+5:302024-01-25T16:52:39+5:30
ठाणे जिल्ह्यातील तब्बल २८ ग्रामपंचायतींची या स्मार्ट ई ग्रंथालयासाठी निवड करण्यात आली आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांचे सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांना डिजिटल साक्षरतेच्या जगात प्रवेश देण्यासाठी ठाणेजिल्हा परिषद आणि सर्वाहिते या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिल्या ई ग्रंथालयाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री कपिल पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आले. भिवंडी येथील राहनाळ गावकऱ्यांसाठी करण्यात आले. त्याप्रमाणे आता भिवंडीसह शहापूर, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांमधील तब्बल २८ ग्राम पंचायतींची या स्मार्ट ई ग्रंथालयासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी नागरिकांप्रमाणेच ग्रामस्थही स्मार्ट बनण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
भिवंडीच्या याराहनाळ ग्राम पंचायतीमध्ये सुरू केलेलेया ई ग्रंथालयामध्ये तब्बल विविध प्रकारचे दाेन हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचे नियाेजन करण्यात आले आहे. या ई ग्रंथालयात ऑडिओबुक्स, स्मार्ट टीव्ही आणि वाय-फाय यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधां ही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 'वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार' ही मोहीम सर्वच क्षेत्रात जोर धरत आहे. लहानगे, तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वानाच वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यातून समाज प्रबोधन व्हावे या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पनेतून नागरी सुविधेच्या २८ ग्रामपंचायतींमध्ये ई स्मार्ट ग्रंथालय तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येकी ५ लाखाचे अनुदान देण्यात येणारअसून, आतापर्यंत ठिकठिकाणच्या ६ ते ७ स्मार्ट ग्रंथालयांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.
भिवंडीतील राहनाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात उभारण्यात आलेले ई ग्रंथालय हे यापैकी पहिलेच आहे. या प्रमाणेच आता भिवंडी तालुक्यातील २० ई ग्रंथालयांप्रमाणेच शहापूर व कल्याण तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन आणि अंबरनाथ तालुक्यात दाेन ग्रंथालये सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.