ठाण्यात स्मार्ट मीटरचा प्रयोग झाला सुरु, तीन महिन्यात घरगुती नळ संयोजनावरही बसविले जाणार मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:14 PM2019-04-01T17:14:43+5:302019-04-01T17:16:39+5:30
ठाणे महापालिकेच्या वतीने अखेर प्रायोगिक तत्वावर २० मीटर बसविण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील तीन महिन्यात शहरात हा प्रयोग राबविला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
ठाणे - आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशा पध्दतीने मागील १२ वर्षे पालिका नळ संयोजनांवर मीटर बसविण्यासाठी विविध पध्दतीन निविदा काढल्या होत्या. परंतु अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता स्मार्ट मीटर बसविले जाणार असून पालिकेने काढलेल्या निविदेला देखील प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार आता ब्लक स्वरुपात व्यावसायिक वापराच्या नळ संयोजनांवर मीटर बसविण्याचा प्रयोग पालिकेमार्फत सुरु झाला आहे. त्यानुसार मे अखेर पर्यंत घरगुती वापराच्या नळसंयोजनावर देखील मीटर बसविण्यास सुरवात होईल असा दावा पालिकेने केला आहे.
पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरुपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसविण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. मधल्या काळात तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी ही योजनाच गुंडाळली होती. दरम्यान, पुन्हा ए.आर.एमचे सेमी आॅटोमेटीक मीटर बसविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार या कामाच्या निविदा मागील वर्षी मागविण्यात आल्या होत्या. हे रोड मॉडेल पीपीपी तत्वावर राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही, प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर या कामासाठी स्मार्टसिटीतून खर्च करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि या कामासाठी १०४.५० कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली. दुसरीकडे स्मार्टसिटीच्या बैठकीत या मीटरचा बोजा ठाणेकरांवर पडू नये असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा झाला आणि ठाणे महापालिका स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च स्वत: उचलणार आहे. त्यानुसार आता १ लाख १३ हजार स्मार्ट मीटर पहिल्या टप्यात बसविले जाणार असून यामध्ये इमारतींचा समावेश असणार आहे. त्यानुसार आता या प्रक्रियेला सुरवात झाली असून प्रायोगिक तत्वावर व्यावसायिक वापराच्या नळ संयोजनांवर २० ठिकाणी अशा स्वरुपाचे मीटर बसविण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्याटप्याने इतर सर्व व्यावसायिक नळ संयोजनावर अशा स्वरुपाचे मीटर बसविले जाणार आहेत. त्यानंतर इमारतींना मीटर बसविले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. त्यानुसार घरगुती वापराच्या नळ संयोजनांवर पुढील तीन महिन्यात मीटर टप्याटप्याने बसविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.