स्मार्ट मीटर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:00 AM2019-11-12T01:00:41+5:302019-11-12T01:00:45+5:30

मागील कित्येक वर्षे कागदावर असलेली ठाणे महापालिकेची स्मार्ट मीटरची पहिल्या टप्प्याची योजना अखेर सुरू झाली आहे.

The smart meter revolves around the debate | स्मार्ट मीटर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

स्मार्ट मीटर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

googlenewsNext

ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेली ठाणे महापालिकेची स्मार्ट मीटरची पहिल्या टप्प्याची योजना अखेर सुरूझाली आहे. परंतु, ती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण, पहिल्या टप्प्यात वाणिज्य आणि सोसायट्यांत मीटर लावतानाच झोपडपट्टी भागातील काही घरांनाही हे मीटर बसविल्याचे पडसाद सोमवारच्या महासभेत उमटले.
झोपडपट्टी भागातही मीटर बसून संबंधित एजन्सीचा बिले काढण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी सभागृहात केला. त्यानंतर, मात्र आपली बाजू सावरण्यासाठी जर झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू असतील, तर ती तत्काळ थांबवण्यात येतील, असे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सभागृहात सांगितले.
आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिका नळजोडण्यांवर मीटर बसविण्यासाठी निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते बसविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, तब्बल एक लाख ४० हजार मीटर बसविले जाणार असून आतापर्यंत २२ हजारांहून अधिक मीटर बसविले गेले आहेत. घोडबंदर, माजिवड्यासह इतर भागांत ते बसविले आहेत. मात्र, सुरु वातीला केवळ वाणिज्य आणि सोसायट्यांत ते बसवण्याचे आदेश असताना महापौरांच्या मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत, दिवा, मुंब्रा, कोलशेत अशा अनेक झोपडपट्टीभागात ते बसवण्यात आले असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर नगरसेवकांनी
उघड केली.
जर एका प्रभागात मीटर बसवण्याचे काम सुरू केले असेल, तर त्या संपूर्ण शहरात मीटर बसवण्यात यावेत, अशी मागणी महापौरांनी केली. तर, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीदेखील आपल्या प्रभागात अजूनही स्मार्ट मीटर बसवण्याची विचारणा होत असल्याने नेमका हा काय प्रकार आहे, असा प्रश्न केला.
>आयुक्तांनीच मांडली वस्तुस्थिती : कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, सुरुवातीला झोपडपट्टी भागात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर केवळ वाणिज्य वास्तू आणि सोसायट्यांतच ते बसवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ढोले यांच्या उत्तरावर नगरसेवक समाधानी न झाल्याने प्रशासनाची बाजू सावरण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात बाजू मांडली. शहरात पाच लाखांपेक्षा अधिक नळजोडणीधारक असून एवढ्या जोडण्यांवर स्मार्ट मीटर बसवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात केवळ एक लाख ४० हजार मीटर बनवण्यात येणार असून त्यानंतरच्या टप्प्यात सर्व ठिकाणी ते बसवले जाणार असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तरावरही नगरसेवक समाधानी न झाल्याने ज्या ठिकाणी अशाप्रकारचे झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू केली आहेत, ती कामे तत्काळ थांबवण्यात यावीत, असे आदेश त्यांनी दिले असल्याची माहिती सभागृहात अर्जुन अहिरे यांनी दिल्याने या वादावर अखेर पडदा पडला.

Web Title: The smart meter revolves around the debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.