ठाणे महापालिका बसविणार स्मार्ट मीटर
By Admin | Published: October 15, 2015 01:45 AM2015-10-15T01:45:11+5:302015-10-15T01:45:11+5:30
गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले नळजोडणीवरील मीटर बसविण्याचा प्रस्ताव आता पुन्हा नव्याने पटलावर आला आहे.
ठाणे : गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले नळजोडणीवरील मीटर बसविण्याचा प्रस्ताव आता पुन्हा नव्याने पटलावर आला आहे. पूर्वीची हायटेक योजना अतिखर्चीक असल्याने अखेर ती कागदावरच ठेवून पालिकेने आता कमी खर्चाची नवी स्मार्ट मीटर योजना पुढे आणली आहे. ती पीपीपी म्हणजे
खाजगी लोकसहभागातून राबविली जाणार असून याअंतर्गत आॅन दी स्पॉट रीडिंग घेतानाच त्याच वेळेस ग्राहकाला रीडिंगनुसार पाण्याचे बिल अदा करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि प्रभाग समितीपर्यंत जाण्याचा खर्चही वाचणार आहे.
पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने मीटर बसविण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी घेतला होता.
आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही स्मार्ट मीटर योजना पुढे आणली आहे. ती खाजगी लोकसहभागातून राबविली जाणार असून सात वर्षांसाठी खाजगी संस्थेला हे काम दिले जाणार आहे. या संस्थेनेच रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी नेमायचे असून मीटर बसविण्यापासून त्यांची निगा, देखभाल आदी कामेही त्यांनाच करावी लागतील. तसेच, मीटर खराब झाले तरी ते बदलण्याची जबाबदारीदेखील संबंधित संस्थेची असणार आहे. पूर्वीच्या योजनेप्रमाणे बिलांचे प्रिटिंग, वाटप, रीडिंग याची जबाबदारी त्याचीच असेल.
तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. दरम्यान, त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी या योजनेचा गाशा गुंडाळला. मुंबईत एमआरए पद्धतीचे मीटर बसविण्यासाठी अधिक पैसे खर्च झाले होते. परंतु, बसविलेले मीटर फारसे यशस्वी ठरले नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेचा हा अनुभव गाठीशी बांधून त्यांनी ही योजनाच बंद केली.
पाणी गळती थांबविणे महापालिकेला शक्य होणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून शहरातील जलकुंभांतील दररोजच्या जलसाठ्याची माहिती होणार आहे. हे काम किमान सात वर्षांसाठी दिले जाणार आहे.