ठाण्यातील ५०० विद्यार्थिनी होणार स्मार्ट, महापालिकेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:44 AM2018-07-17T02:44:10+5:302018-07-17T02:44:17+5:30
महापालिका शाळेतील मुलींना दहावीनंतर शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने स्मार्ट गर्ल योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : महापालिका शाळेतील मुलींना दहावीनंतर शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने स्मार्ट गर्ल योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका शाळेतील नववी व दहावीच्या तब्बल ५०० विद्यार्थिनींसाठी नव्या युगाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये फोटोशॉप, ग्राफिक डिझाइन, वेब डिझाइन मल्टिमीडिया अॅनिमेशन यांचा समावेश असणार आहे.
महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींमध्ये सक्षमता आधारित कौशल्य विकास समृद्ध करणे आवश्यक असून त्याद्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या पुढील शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक ठिकाणी होईल, हे पाहणे शिक्षण विभागाचे कर्तव्य आहे. त्यानुसार, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही स्मार्ट गर्लची योजना पुढे आणली आहे. यानुसार, महापालिकेच्या १६ माध्यमिक शाळांमधील नववी व दहावीमधील विद्यार्थिनींना सर्वार्थाने सक्षम बनवून स्पर्धात्मक युगात आपली स्मार्ट ओळख निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
१६ शाळांचा समावेश : या प्रकल्पामध्ये १६ शाळांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १० महिन्यांच्या कालावधीत (आठवड्यात दोन तास) असून ५०० विद्यार्थिनींचा त्यात समावेश असणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी ८० तासांचा असणार आहे. दरवर्षी ४० आठवडे हा अभ्यासक्रम सुरू राहणार आहे. या योजनेसाठी ८८ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित धरला असून तसा प्रस्ताव २० जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मंजुरीनंतर ही योजना प्रत्यक्षात अमलात येईल.\
दहावीनंतर पुढे स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या शिक्षणाचे प्रमाणपत्रसुद्धा
दिले जाणार आहे. याचा नक्कीच भविष्यात या विद्यार्थिनींना फायदा होणार आहे.
- विकास रेपाळे, अध्यक्ष, शिक्षण विभाग