ऊर्जाबचतीवर विद्यार्थ्यांचा स्मार्ट पर्याय
By admin | Published: February 2, 2016 01:52 AM2016-02-02T01:52:50+5:302016-02-02T01:52:50+5:30
थंडीच्या दिवसांत गरम पाण्यासाठी गिझरचा हमखास वापर केला जातो. मात्र, विसरभोळे लोक हा गिझर बंद करायला अनेकदा विसरतात
ठाणे : थंडीच्या दिवसांत गरम पाण्यासाठी गिझरचा हमखास वापर केला जातो. मात्र, विसरभोळे लोक हा गिझर बंद करायला अनेकदा विसरतात. त्याला सर्वाधिक ऊर्जा लागत असल्याने विजेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, ठाण्याच्या स्मार्ट विद्यार्थ्यांनी ऊर्जाबचतीचा स्मार्ट उपाय शोधून काढला आहे. गिझरमुळे होणाऱ्या ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांनी ऊर्जाबचत करणारा एक साधासोपा असा दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारा प्रकल्प तयार केला आहे.
ऊर्जासमस्या हा एक गंभीर प्रश्न असून त्यादृष्टीने तिचा अपव्यय टाळण्यासाठी विविध उपाय सुचवले जात आहेत. याबद्दल जागरूक असलेल्या आर्य अशार (इयत्ता आठवी), अथर्व पाटील (इयत्ता पाचवी), स्पर्श खन्ना (इयत्ता सातवी), वेद सावंत (इयत्ता सहावी), अमोघ पटवर्धन (इयत्ता आठवी) या विद्यार्थ्यांनी मिळून एक अभिनव प्रकल्प तयार केला आहे.
गिझर हे हाय पॉवर डिव्हाइस असून इतर डिव्हाइसपेक्षा त्याला जास्त ऊर्जा लागते. अनेकदा ते चालू राहिल्यामुळे वीज मोठ्या प्रमाणात वाया जाते. त्यामुळे आपल्या घरातच असलेल्या गिझरला ही सिस्टीम लावली तर बऱ्याच प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. या सिस्टीमला बंदचालू अशी दोन बटणे लावली आहेत. गिझरला शॉक लागण्याची अधिकशक्यता असल्याने या सिस्टीमला शॉकप्रूफ बटणे लावली असल्याचे चिल्ड्रन टेक सेंटरचे संचालक पुरुषोत्तम पाचपांडे यांनी सांगितले.
गिझरमधून येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ सेट केली आहे. पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लो सेन्स बसविला आहे. सध्या या सिस्टीममध्ये १० मिनिटांची वेळ सेट केली आहे.