कल्याण-डोंबिवलीत आता हाेणार स्मार्ट ‘निवारे’;बसथांबे उभारण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:00 AM2020-11-09T00:00:15+5:302020-11-09T00:01:20+5:30
बीओटी तत्त्वावर होणार काम
कल्याण : केडीएमटीचे तुटलेले, गंजलेले असे दयनीय अवस्थेतील बसथांबे आता बदलण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उच्च प्रतीचे स्टेनलेस स्टीलचे प्रवासी बसथांबे उभारण्यास केडीएमटीकडून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर १० महत्त्वाच्या ठिकाणी हे थांबे उभारण्यात येणार आहेत. पुढे टप्प्याटप्प्याने शहरातील जुन्या थांब्यांच्या ठिकाणी हे नवीन थांबे उभे राहतील.
केडीएमसीने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास, व्यवस्थापन आणि सुशोभीकरणास सुरुवात केली आहे. परिवहन हा नागरिकांना वाहतूक सेवा पुरवणारा उपक्रम असल्याने ‘वाहतूक व्यवस्थापन’ या अंतर्गत परिवहन उपक्रमाची भूमिका स्मार्ट सिटी प्रकल्पात महत्त्वाची राहणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वेस्थानक परिसरातील बसथांब्यांची उभारणी त्यांच्यातर्फे केली जाणार आहे. तर, त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अन्यत्र बसथांब्यांची उभारणी केडीएमटी उपक्रमांतर्गत केली जाणार आहे.
या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला ऑगस्ट २०१९ च्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार बसथांब्यांची डागडुजी, रंगरंगोटी करणे, फ्लोअरिंग दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यकतेनुसार नवीन बसथांबे उभारणे आदी जबाबदारी कंत्राटदाराची असेल.
केडीएमसी हद्दीत १५० नवीन बसथांबे उभारण्यात येणार आहेत. बीओटी तत्त्वावर हे निवारे उभारण्याचे काम चालू झाले असून, या कामाचे कंत्राट पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. कंत्राटदाराला जाहिरातीचे हक्क प्रदान केले असून, कंत्राटदाराकडून केडीएमटीला प्रतिमहा भाडेही मिळणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी दिली.