ठाणेकरांसाठी रस्त्याच्या कडेला महापालिका उभारणार स्मार्ट शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:28 AM2019-07-24T00:28:42+5:302019-07-24T00:28:51+5:30
या रस्ता रुंदीकरणात अस्तित्वातील २४ मीट रुंद रस्त्यावरील बाधीत निवासी, अनिवासी बांधकामे हटविली आहेत.
ठाणे : ठाणे महापालिकेने पोखरण रस्ता क्रमांक १, व २ यांचे रुंदीकरण केले आहे. यामध्ये अनेक बांधकामे बाधीत झाली असून, शौचालयेसुध्दा तोडण्यात आली आहेत. त्यामुळे आता या रस्त्यांच्या कडेला पालिकेच्या माध्यमातून स्मार्ट ई शौचालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यासाठी १ कोटी ६० लाखांचा खर्च केला जाणार आहे.
या रस्ता रुंदीकरणात अस्तित्वातील २४ मीट रुंद रस्त्यावरील बाधीत निवासी, अनिवासी बांधकामे हटविली आहेत. यामध्ये काही ठिकाणी शौचालयेसुद्धा बाधीत झाली होती. त्यामुळे नव्याने रस्त्याच्या कडेला किमान ५०० मीटर अंतरावर दोन्ही बाजूस शौचालय बांधण्याचा निर्मय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार पोखरण रोड क्रमांक १,२,३, बॅ. नाथ पै रस्ता, पवारनगर रस्ता या रस्त्यांच्या लगत कमी जागेत स्वच्छ, स्मार्ट, अद्ययावत, कॉम्पेक्ट, सेल्फ क्लिनींग अशी शौचालये उभारली जाणार आहेत. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या सीएसआर फंडामधून ही कामे केली जाणार होती. परंतु निधीबाबत त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर न आल्याने पालिका आता स्वत:च्या निधीतून ही २0 शौचालये बांधणार आहे.