‘क्लस्टर’विनाच ठाणे होणार स्मार्ट
By admin | Published: September 25, 2016 04:30 AM2016-09-25T04:30:58+5:302016-09-25T04:30:58+5:30
स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत ठाणे शहराची निवड झाल्यानंतर येत्या चार वर्षांत ठाणे स्मार्ट होईल, असे महापालिका सांगत असली तरी या योजनेतून शहरवासीयांची जिव्हाळ्याची क्लस्टर
ठाणे : स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत ठाणे शहराची निवड झाल्यानंतर येत्या चार वर्षांत ठाणे स्मार्ट होईल, असे महापालिका सांगत असली तरी या योजनेतून शहरवासीयांची जिव्हाळ्याची क्लस्टर योजना मार्गी लागेल अथवा नाही, याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. क्लस्टरचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात असल्यामुळेच ठाणे शहर स्मार्ट सिटी जरी होणार असले, तरी शहरात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायम राहणार आहे.
स्मार्ट सिटीसाठी तब्बल ६ हजार कोटींचा जम्बो आराखडा तयार केला असून त्यामध्ये क्लस्टर योजनेसाठी ४ हजार कोटींची तरतूद आहे. पहिल्या यादीमध्ये नाव येण्याचा आत्मविश्वास असल्याने यापूर्वीच विविध प्रकल्पांचा अभ्यास तसेच त्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने येत्या चार वर्षांत शहर स्मार्ट होण्याचा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ठाण्याचे नाव मंगळवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली असली, तरी ठाण्याला स्मार्ट दिशेने घेऊन जाण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीच प्रयत्न सुरू केले आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत १ हजार कोटींची ठाण्यात विविध प्रकारची विकासकामे होणार असून यामध्ये ५०० कोटी केंद्र सरकार, तर ५०० कोटी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे करावे लागणार आहेत. स्मार्ट सिटीच्या योजना राबवण्यासाठी तब्बल ६ हजार ६३० कोटींचा कृती आराखडा यापूर्वीच तयार केला होता. यामध्ये एरिया बेस डेव्हलपमेंट तसेच नियोजनबद्ध विकासाचा समावेश आहे. स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये नाव जाहीर होण्याच्या आधीच विविध प्रकल्पांचा सर्व्हे पूर्ण केला असून पेपर वर्कदेखील पूर्ण झाले आहे. यामध्ये नवीन एलिव्हेटेड ठाणे स्थानक, खाडीकिनारा विकास, ठाणे पूर्व सॅटीस प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाची परवानगी
स्टेशन प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळाली असून खाडीकिनारा विकासासाठी केंद्र शासनदेखील अनुकूल आहे. सर्व प्रकल्पांचा डीपीआर तयार झाला असून येत्या काळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन चार वर्षांत ठाणे स्मार्ट शहर असेल, असा दावा पालिकेने केला आहे.
असे असले तरी ठाण्यासाठी क्लस्टर योजनादेखील महत्त्वाची मानली जात आहे. शहरात आजघडीला ३ हजारांहून अधिक इमारती धोकादायकच्या यादीत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी पालिका विविध स्तरांवर योजना हाती घेत आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीच्या योजनेतदेखील तब्बल ४ हजार कोटी रुपये यासाठी प्रस्तावित केले आहेत.
संपूर्ण खाजगी लोकसहभागातून (पीपीपी) क्लस्टर योजना राबवण्यात येणार असून विकासकांना जास्तीतजास्त एफएसआय देऊन ठाणेकरांसाठी अधिक घरे उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. मात्र, क्लस्टरचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात असल्याने येत्या चार वर्षांत ही योजना मार्गी लागेल की नाही, याची शाश्वती नसल्याने क्लस्टरविनाच ठाणे स्मार्ट होईल, अशी शक्यता असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.