जेव्हा अनाथ मुलींच्या चेह-यावर हसू उमटतं..., १०० अनाथ मुलींचं अनोखं बर्थडे सेलीब्रेशन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:47 PM2018-04-24T15:47:00+5:302018-04-24T15:48:24+5:30
ठाण्यातील बेघर मुलांना आश्रय देणारी माँ निकेतन ही सेवाभावी संस्था आणि आय लीफ रिट्ज या आलिशान पार्टी हॉलचे मराठमोळे संचालक एकत्र येऊन तब्बल १०० बेघर, अनाथ मुलांचा वाढदिवस साजरा केला.
ठाणे : वाढदिवस म्हटला की, केकवरची मेणबत्ती फुंकर घालून विझवणं, फुगे फोडणं, बर्थडे गीत गाणं आलंच. आपल्या लेकीच्या वाढदिवसाला काय करू अन् काय नको, असं आईवडिलांना होतं. पण ज्या मुली आईवडिलांशिवायच अनाथालयामध्ये लहानाच्या मोठ्या होत असतील त्यांचे काय? त्यांचा वाढदिवस कधी आनंदात, जल्लोषात साजरा होत असेल काय? नेमका हाच विचार करून ठाण्यातील 'मा निकेतन' ही सेवाभावी संस्था आणि 'आयलीफ रिट्झ' बॅंक्वेट्स यांनी सोमवारी एकाचवेळी तब्बल १०० मुलींचा वाढदिवस अत्यंत शानदारपणे साजरा केला. त्यामुळे या मुलींच्या चेह-यावर सुंदर हसू उमटलं. ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या आयलीफ रिट्झ बॅंक्वेटमध्ये हे अनोखं बर्थडे सेलीब्रेशन रंगलं तेच मुळी शेकडो फुगे, संगीत, विविध खेळ, भेट वस्तू आणि छोटा भीम या कार्टून कॅरॅक्टरच्या साक्षीने. बर्थडे केक म्हणून आणलेला भलामोठा केक पाहून या मुली आश्चर्यचकीतच झाल्या. बर्थडे केक कापताना सर्वांनी मनसोक्त सेल्फी- फोटोसुद्धा काढून घेतले. मा निकेतनमधली १० वर्षांची पूजा म्हणाली, "छोटा भीमला मिठी मारताना आणि त्याच्यासोबत नाचताना मला खूपच आनंद झाला. यापूर्वी मी इतका सुंदर,आलिशान पार्टी हाॅल कधीही पाहिला नव्हता. माझा वाढदिवस इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केला जाईल,अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती."
"आयलीफ रिट्झ बॅंक्वेट गेल्या वर्षी सुरू केल्यानंतर वर्षभरात आम्ही अनेक शानदार, आलिशान सोहळे आयोजित केले. पण आमच्या प्रथम वर्षपूर्तीच्या निमित्ताने आज या १०० अनाथ मुलींचा साजरा केलेला वाढदिवस खरोखरच आनंददायी होता. ज्यांना बर्थडे पार्टी माहीत नाही, अशा या मुलींसाठी ही अनोखी बर्थडे पार्टी आयोजित करण्याची मजा खूपच निराळी होती", असं मत आयलीफ रिट्झ बॅंक्वेटचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीश आंबेकर यांनी व्यक्त केले. मा निकेतनच्या विश्वस्त सिस्टर अम्रिता म्हणाल्या, "आयलीफ रिट्झ बॅंक्वेटच्या आमंत्रणाच्या निमित्ताने या मुलींचा वाढदिवस प्रथमच संस्थेच्या बाहेर साजरा झाला. एखाद्या भल्यामोठ्या पार्टी हाॅलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होणं म्हणजे त्यांच्यासाठी एक स्वप्नपूर्तीच आहे."