पोलीस ठाण्यात धूम्रपान करणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:50 PM2019-12-16T23:50:46+5:302019-12-16T23:50:56+5:30
वागळे इस्टेट पोलिसांचा उपक्रम : पोलिसांसह नागरिकांनीही केले स्वागत
जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तंबाखू, गुटखा आणि मद्यसेवनामुळे आरोग्यावर व कामावर होणारा परिणाम लक्षात घेता, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या आवारात आणि पोलीस ठाण्यात पोलिसांसह सर्वांनाच धूम्रपानबंदी केली आहे. या परिसरात कोणीही धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर २०० रुपये दंडासह कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी दिली. सरकारी कार्यालयांत धूम्रपानावर बंदी असतेच. मात्र, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याची कसोशीने अंमलबजावणी सुरू झाली आहे.
नळावरील भांडणांपासून ते सासूसासऱ्यांकडून होणारा विवाहितेचा छळ किंवा छेडछाडीच्या तक्रारी घेऊन महिलावर्ग मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात येतो. त्यांच्यासमवेत लहान मुलेही असतात. अशा वेळी पोलीस ठाण्यातील कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी जर धूम्रपान करीत असेल तर त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होते. शिवाय, आलेल्या मुलांमध्येही चुकीचा संदेश जातो. कामावर आणि पोलिसांच्या आरोग्यावरही त्याचा घातक परिणाम होण्याची भीती असते. अनेक व्यसनाधीन पोलीस कर्मचारी हे निवृत्तीपूर्वीच अनेक व्याधींनी ग्रस्त असतात. अनेकांचा कर्करोग, हृदयविकाराने मृत्यू होतो. त्यामुळे पोलिसांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी कामावर तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात कोणीही धूम्रपान करू नये, असा आदेशाचा फलक पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावल्याचे पठाण यांनी सांगितले. अर्थात, हाच नियम पोलिसांप्रमाणे येणाºया तक्रारदार आणि आरोपींनाही लागू आहे. त्यामुळे आता पोलीस ठाण्यात येणारे फिर्यादी हे पोलीस ठाण्याच्या बाहेरच आपली तल्लफ भागवतात.
पोलीस ठाण्याच्या बाहेरच ‘स्मोकिंग झोन’ केल्यामुळे काही तक्रारदार त्या भागाकडे जातात. पण, पोलीस ठाण्यात आणि आवारात धूम्रपानाला सक्त मनाई केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम जाणवू लागल्याचे या पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचारीही सांगतात. हाच कित्ता इतर पोलीस ठाण्यांनीही सुरू केल्यास पोलीस आणि फिर्यादी दोघांनाही त्याचा फायदाच होईल, असे मत व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या आरोग्यावर तसेच कामावर विपरित परिणाम होऊ नये तसेच तक्रारदारांनीही नशेच्या अमलाखाली येऊन कोणाची तक्रार करू नये, अशा अनेक उद्देशांनी हा नियम लागू करण्यात आला आहे. कडक अंमलबजावणीमुळे पोलीस ठाण्यात कोणीही धूम्रपान करीत नाही.
-अफजल पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट, पोलीस ठाणे