'समृद्धी' अपघात : जीवाच्या आकांतानं ३० फुटांवरून भातशेतात मारली उडी, बचावलेल्या प्रेमप्रकाशने सांगितला रात्रीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:28 AM2023-08-02T07:28:06+5:302023-08-02T07:37:25+5:30

समृद्धी महामार्गाच्या कामात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या आणि शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला प्रेमप्रकाशनं ‘लोकमत’शी बोलताना सांगितला थरार...

Smruddhi mahamarg accident Premprakash jumped from 30 feet into the paddy field says thrill of the night | 'समृद्धी' अपघात : जीवाच्या आकांतानं ३० फुटांवरून भातशेतात मारली उडी, बचावलेल्या प्रेमप्रकाशने सांगितला रात्रीचा थरार

काहीही करून जीव वाचवायचा या आकांताने प्रेमप्रकाशने ३० फूट उंचीवरून याच भातशेतीत उडी मारली. 

googlenewsNext

श्याम धुमाळ -

कसारा : रात्रीचे पावणेबारा वाजले होते. गर्डर बसविण्याचे काम सुरू होते. पावसाची रिपरिप सुरू होती. आजूबाजूला चिखलाचे साम्राज्य असल्याने पाय घसरण्याची भीती होती. काही जण थेट गर्डरच्या खाली होते. मी आणि माझ्यासह काही कामगार गर्डरच्या वर चढविण्यासाठी ३० ते ३५ फुटांवर चढलो होतो. अचानक घर्षण झाले. गर्डर लॉन्चरमध्ये स्पार्क उडाला. त्याच्या ठिणग्या चमकत उडाल्या आणि प्रचंड आवाज करत लॉन्चरसह गर्डर कोसळले. सारे इतक्या क्षणात घडले, की कुणाला कसलाही विचार करायलाही वेळ मिळाला नाही. मी गर्डरच्या वरच्या मजल्यावरून जीवाच्या आकांताने जवळच्या भातशेतीत उडी घेतली. वरून पडल्याने मला चांगलाच मार लागला होता. तब्बल तासभर मी भातशेतीच्या चिखलात निपचित पडून होतो... समृद्धी महामार्गाच्या कामात झालेल्या अपघातात जखमी झालेला आणि शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला प्रेमप्रकाश ‘लोकमत’शी बोलत होता.

प्रेमप्रकाश म्हणाला, तासाभरानंतर मी शुद्धीवर आलो. तेव्हा गर्डरखाली अडकलेले माझे काही साथीदार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. किंचाळत होते. विव्हळत होते. काहींना क्षणाचीही उसंत मिळाली नाही. मृत्यूने त्यांचा घास घेतला. आजूबाजूच्या गावातील काही तरुण मदतीकरिता आले होते. मात्र गर्डरचे वजन प्रचंड असल्याने त्यांना मदतकार्य करणे अशक्य होते. तरीही ग्रामस्थांनी काहींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. ग्रामस्थांच्या मदतीने मी भातशेतीतून बाहेर आलो. लोकांनी मला पाणी दिले. मी प्रचंड भेदरलो होतो. मृत्यू माझ्या शेजारून गेल्याचाच जणू तो अनुभव होता.

मी इतक्या वरून जीवाच्या आकांताने उडी मारली नसती, तर कदाचित मीही आज जिवंत नसतो. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मला माझ्या कुटुंबीयांची आठवण झाली. अशा संकटाच्या क्षणी आपल्याबरोबर जीवाभावाचे कुणीच नाही, या विचाराने मन विषण्ण झाले. अशा कामाच्या वेळी जोखीम प्रचंड असते. मात्र अधिक काळजी घेऊन काम केले, तर अशी जीवितहानी टाळता येऊ शकते. माझ्याबरोबर जखमी झालेल्या अन्य दोघा साथीदारांना गंभीर जखमा असल्याने ठाण्यात व नंतर मुंबईला उपचाराकरिता हलविल्याचेही त्याने सांगितले. 

 

Web Title: Smruddhi mahamarg accident Premprakash jumped from 30 feet into the paddy field says thrill of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.