जेवायला गेले आणि सुदैवाने तिघेही वाचले, मृतांमध्ये उ. प्रदेश, बिहारमधील कामगार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 08:28 AM2023-08-02T08:28:04+5:302023-08-02T08:28:52+5:30
अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, गर्डर टाकताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या किंवा कसे हे तपासले जाईल, असे मंत्री भुसे व चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.
नारायण शेट्टी -
शहापूर : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातमृत्यू झालेले बहुतांश कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू अशा विविध प्रांतांतील आहेत. केवळ तीन कामगार किरकोळ जखमी झाले, तर तीन कामगार जेवण करायला गेल्याने सुदैवाने बचावले.
दुर्घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा शहापूर उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले आणि जखमींची विचारपूस केली.
अधिकाऱ्यांची देखरेख -
- दुर्घटनेची माहिती मिळताच एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, आमदार दौलत दरोडा, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली.
- विक्रम देशमाने पोलिस अधीक्षक (ठाणे ग्रामीण), पोलिस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलिस निरीक्षक अनंत पराड, सिव्हिल सर्जन रवींद्र पवार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यावर देखरेख केली.
उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन
अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, गर्डर टाकताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या किंवा कसे हे तपासले जाईल, असे मंत्री भुसे व चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.
मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली, तर पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत दिली जाणार आहे.
घटनाक्रम -
सोमवारी रात्री ११:५० वा. : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील समृद्धी महामार्गाच्या गर्डर टाकण्याच्या कामाच्या ठिकाणी गर्डर लाँचर कोसळला.
मध्यरात्री १२ वा. : गर्डर कोसळतानाचा आवाज ऐकताच सरलांबे व आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ मदतीकरिता घटनास्थळी धावले.
मध्यरात्री १ वा. : पोलिसांचे मदतकार्य सुरू.
मध्यरात्री २ वा. : तीन मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले.
पहाटे ४ वा. : जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने घटनास्थळी दाखल.
पहाटे ४:३० वा. : हायड्रॉलिक क्रेन मदतकार्याकरिता दाखल.
पहाटे ५ वा. : मंत्री दादा भुसे व मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी दाखल.
सकाळी ६ वा. : गर्डर उचलण्यास प्रारंभ
सकाळी ७ वा. : एनडीआरएफ व टीडीआरएफची टीम मदतकार्यासाठी दाखल.
सकाळी ९ वा. : शहापूर उपजिल्हा रुग्णालयात १४ मृतदेह शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले.
दुपारी ४ वा. : मृतांची संख्या पोहोचली १८ वर.
सायंकाळी ६ वा. : मदतकार्य सुरूच. मृतांची संख्या २०वर.