वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्यास मुंब्य्रातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 05:53 PM2019-08-14T17:53:41+5:302019-08-14T17:58:03+5:30
मुंब्रा येथील वाय सर्कल जवळ वाघाच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या शशिकांत दंडवते याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने मंगळवारी अटक केली.
ठाणे: वाघाच्या कातडीची दहा लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या शशिकांत दिनकर दंडवते (४४, रा. व्हनाळी, कोल्हापूर) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून वाघाच्या बछडयाचे कातडे हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्रा येथील वाय सर्कल जवळील ‘माज’ हॉटेल जवळ एकजण बॅगेमध्ये वाघ या वन्यजीव प्राण्याचे कातडे विक्री करण्यासाठी १३ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वन्यजीव विभागाचे वनपाल मनोज परदेशी यांच्या मदतीने पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, कैलास सोनावणे, हवालदार सुभाष मोरे, अबुतालीब शेख आणि चंद्रकांत वाळूंज आदींच्या पथकाने मुंब्रा येथील वाय सर्कलजवळ सापळा रचून शशिकांत दंडवते याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेच्या तपासणीमध्ये वाघाच्या बछडयाचे जुने सुकवून कडक झालेले कातडे मिळाले. या कातडयाची दहा लाखांमध्ये विक्री करण्यासाठी तो ठाण्यात आला होता, अशी माहिती चौकशीमध्ये उघड झाली. हे कातडे वाघ या वन्यजीव प्राण्याचेच असल्याचे निरीक्षक वनपाल परदेशी यांनी नोंदविले आहे. त्यानंतर याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दंडवते याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १६ आॅगस्ट २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या कातडयाची आकुर्डी, पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतही तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.