गांजाच्या तस्करीसाठी तेलंगणातून आलेल्या तस्कराला मुंब्य्रात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 07:47 PM2019-07-11T19:47:53+5:302019-07-11T20:06:27+5:30
गांजा तस्करीतील शिवाजी या कर्नाटकातील टोळी प्रमुखाला अटक झाल्यानंतर त्याचा व्यवसायावर कब्जा करुन ठाणे- मुंबईत गांजाच्या तस्करीसाठी पाय रोवणाऱ्या प्रकाश पवार या तेलंगणातील तस्कराला ठाणे पोलिसांनी गांजाच्या साठयासह अटक केली आहे.
ठाणे: गांजाच्या तस्करीसाठी हैद्राबाद, तलंगणा राज्यातून मुंब्य्रामध्ये आलेल्या प्रकाश पवार (२७, रा. रा. लिंगमपल्ली, हैद्राबाद, तेलंगणा) याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतीच अटक केली. त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचा २५ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस विजय पोवार, पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, पोलीस नाईक शिवाजी शेगर, नामदेव मुंढे आणि अनुप राक्षे आदींचे पथक मुंब्रा परिसरात ३ जुलै २०१९ रोजी गस्त घालीत होते. याच गस्ती दरम्यान शीळ मुंब्रा रोडवरील वाय जंक्शन येथे एक संशयास्पद व्यक्ती पळून पोलिसांना पाहून पळून जात असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्याला या पथकाने शिताफीने पकडले. प्रकाश पवार असे नाव त्याने सांगून आपण रिक्षा चालक असल्याचे सांगितले. मुळ कर्नाटकातील बिदर जिल्हयातील जगमी बॉर्डर येथील असून तेलंगणातील हैद्राबाद येथे वास्तव्याला असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये दहा किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर काही वस्तू असा एक लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे न्यायालयाने त्याला १२ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने हैद्राबाद येथे लपवून ठेवलेला १५ किलो वजनाचा गांजाही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून आतापर्यंत २५ किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तो हैद्राबाद येथून ठाणे, मुंबईमध्ये गांजाची तस्करी करीत होता. कर्नाटकातील शिवाजी या गांजा तस्कराकडे तो काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याला कर्नाटक पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे शिवाजीच्या गांजाच्या मार्केटवर प्रकाशने कब्जा केला होता. तो हळू हळू या तस्करीमध्ये आपला जम बसवित असतांनाच ठाणे पोलिसांनी त्याला संपूर्ण मालासह पकडल्यामुळे तो यामध्ये अडकला. त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, याचाही सखोल तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी सांगितले.