गासमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Published: May 31, 2017 03:41 AM2017-05-31T03:41:54+5:302017-05-31T03:41:54+5:30
गास गावात घुसलेल्या चोरट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दगड-विटांनी हल्ला केला. त्यात तीन गावकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : गास गावात घुसलेल्या चोरट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दगड-विटांनी हल्ला केला. त्यात तीन गावकरी जखमी झाले. गेल्या तीन दिवसांपासून चोरटे गावात येत असल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.
शनिवार मध्यरात्रीपासून सलग तीन रात्र चोरटे गावात घुसत आहेत. पहिल्या दिवशी गावातील पाटील आळीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पहिल्यांदा चोरट्यांनी कृष्णा पाटील यांच्या मागच्या दाराला भगदाड पाडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून माल लुटण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेजारील तबेल्यात मालक आणि नोकर बोलत असल्याचे चोरट्यांनी ऐकले. त्यामुळे त्यांना घरातून पळ काढला.
दुसऱ्या रात्री चोरटे पु्न्हा पाटील आळीत घुसले. यावेळीही एक घर फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे असफल ठरला. तिसऱ्या रात्री चोरट्यांना कुत्र्यांनी रोखून धरले. मध्यरात्री कुत्री भुंकत असल्याने चोरटे राजू नाईक यांच्या घरामागे लपून राहिले होते. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गावकरी गावात गस्त घालत असताना त्यांना चोरटे दिसून आले. मात्र, गावकरी अंगावर येत असल्याचे पाहून चोरट्यांनी दगड, विटा, लोखंडी सळ्यांच्या साहय्याने हल्ला चढवला. हल्ल्यात चंद्रकांत पाटील, कल्पेश नाईक आणि हार्दिक नाईक जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि खांद्याला, गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील आणि आशिष जोशी यांच्यासह गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.