ओरिसातून ठाण्यात गांजाची तस्करी: तिघींकडून ५० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:14 PM2018-05-30T22:14:53+5:302018-05-30T22:14:53+5:30
ओरिसातून ठाणे आणि कल्याण परिसरात रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून साडे सात लाखांचा गांजा हस्तगत केला.
ठाणे: ओरिसातून मुंबई- ठाण्यामध्ये गांजाची तस्करी करणा-या जुन्नु डकवा (४५), सरोजिनी स्वाईन (३१) आणि बब्बी रेड्डी (३५, रा. तिघीही ओरिसा) या तिघींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ५ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ४९ किलो ७२८ ग्रॅमचा सुमारे सात लाख ४५ हजार ९२० रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे परिसरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी त्यांची विक्री करणा-यांचा शोध घेण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले होते. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ काही महिला तस्कर मोठया प्रमाणात गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे आणि उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी कल्याणच्या दिपक हॉटेल येथे गांजा विक्रीसाठी गि-हाईकाच्या शोधात उभे असलेल्या या तिघींना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने उपनिरीक्षक बेंद्रे, आर. सी. बनसोडे, जमादार बाबू चव्हाण, प्रदीप कदम, हवालदार मनोज पवार, देविदास जाधव, दिलीप शिंदे आणि महिला नाईक कल्पना तावरे आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेतून मानवी शरीरावर आणि मनावर परिणाम करणारा सात लाख ४५ हजार ९२० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे हे अधिक तपास करीत आहेत.